लेख – अभ्यास करताना कंटाळा येतो का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मीनल सतीश सरकाळे

आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञान प्रधान युगात विद्यार्थ्यापुढे अभ्यासात सातत्य राखण्याचे मोठे आव्हान उभे आहे. अनेक विद्यार्थी अभ्यास करताना कंटाळा येतोअशी तक्रार व्यक्त करतात. मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढती शैक्षणिक स्पर्धा यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कंटाळा येऊ लागतो. मात्र तज्ञांच्या मते हा केवळ आळस नसून मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिक घटकांशी संबंधित एक गंभीर विषय आहे. या समस्येची कारणे आणि त्यावरचे प्रभावी उपाय समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

पण कधी विचार केला आहे का? खेळाडू रोज सराव करतो, गायक रोज रियाज करतो, तर मग विद्यार्थ्यांनी रोज अभ्यास का करू नये? सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मोबाईल, सोशल मीडियाचे आकर्षण आपल्याला खेचत असते. अर्थात मोबाईल काही वेळ आनंद देतो, पण शिक्षण संपूर्ण आयुष्य घडवते. कंटाळा आपला शत्रू नाही, तर तो आपली परीक्षा घेणारा मित्र आहे. जो त्यावर मात करतो तोच खरा विजेता ठरतो. अभ्यास हा केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यावश्यक आहे. सातत्यपूर्ण प्रयत्न हेच यशाचे खरे सूत्र असल्याचे ते अधोरेखित करतात. अभ्यास म्हणजे फक्त परीक्षा पास होण्यासाठी केलेला प्रयत्न नसतो, तर तो आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी असतो.

आज घेतलेला थोडासा त्रास उद्याच्या मोठय़ा यशाची पायरी ठरते.

l अभ्यासाचा कंटाळा येण्याची कारणे

  1. मेंदूवरील ताण आणि एकसुरीपणा अभ्यास करताना मेंदू सतत कार्यरत असतो. नवीन माहिती समजून घेणे, ती लक्षात ठेवणे आणि त्यावर विचार करणे या प्रक्रियेमुळे मानसिक थकवा जाणवतो. सतत एकाच पद्धतीने अभ्यास केल्यास मन भटकते, एकाग्रता कमी होते आणि अभ्यास नकोसा वाटू लागतो. 2. विषय अवघड किंवा समजणारा जेव्हा एखादा विषय समजत नसेल तेव्हा निराश व्हायला होतं, वारंवार प्रयत्न करूनही समजले नाही तर अभ्यासातील रस कमी होतो आणि कंटाळा येतो. 3. एकसुरी अध्यापन पद्धतः फक्त व्याख्यान, पाठांतर, नोट्स लिहिणे यामुळे अभ्यासातील सक्रिय सहभाग कमी होतो. शिकण्यात विविधता नसल्यास अभ्यास कंटाळवाणा वाटतो. 4. उद्दिष्टांचा आणि नियोजनाचा अभाव आपण का शिकतोय, हे ध्येय स्पष्ट नसल्यास अभ्यास निरर्थक वाटू लागतो. तसेच अभ्यासाचे वेळापत्रक नसेल तर कामे वाढतात आणि ताण वाढतो हा ताणच कंटाळ्यात रूपांतरित होतो. 5. मोबाईल डिजिटल आकर्षण सोशल मीडिया, गेम्स आणि व्हिडीओ यामुळे त्वरित आनंद मिळतो, पण त्यामुळे अभ्यासाचे आकर्षण कमी होऊ लागते. 6. मानसिक शारीरिक थकवा पुरेशी झोप नसणे, आरोग्याच्या समस्या, अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव यामुळे एकाग्रता कमी होते. सतत ताण यामुळे मन अभ्यासात लागत नाही. 7. आत्मविश्वासाचा अभाव तसेच नकारात्मक विचारसरणी “मला हे जमत नाही’’, “इतका अभ्यास कसा करणार?’’ असे विचार सतत मनात आले की, अभ्यासाचे ओझे वाटू लागते, प्रयत्न करणे टाळले जाते आणि कंटाळा वाढतो.

अभ्यासाचा कंटाळा हा केवळ आळस नसून विविध वैयक्तिक, शैक्षणिक आणि सामाजिक कारणांचा परिणाम असतो. योग्य मार्गदर्शन, प्रेरणा आणि सकारात्मक वातावरण मिळाल्यास हा कंटाळा कमी करता येतो.

उपाययोजना

  1. नकारात्मक विचारांना दूर करा अभ्यास करताना अनेक विद्यार्थ्यांना कंटाळा येतो. हा कंटाळा केवळ अभ्यासामुळे नसतो तर मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे तो अधिक वाढतो. ‘मला हे जमत नाही’, ‘मी कधीच पास होणार नाही’, ‘इतरांइतका मी हुशार नाही’ असे विचार मनात आले की, अभ्यासाची इच्छा कमी होते आणि मन खचते. त्यामुळे सर्वप्रथम नकारात्मक विचार ओळखून त्यांना दूर करणे आवश्यक आहे. सकारात्मक मनोवृत्तीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. 2. अभ्यासाची पद्धत बदला जास्त मन लावून अभ्यास करा. समजून घेऊन अभ्यास करा. सर्वसाधारण बुद्धिमत्ता असलेला, पण कठोर परिश्रम करून उज्ज्वल यश प्राप्त करू शकतो. तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. 3. लहान उद्दिष्टे ठेवा अभ्यासाचे लहान लहान उद्दिष्ट ठरवून ते निश्चयपूर्वक पूर्ण करावे. वेळेचे ध्येय ठरवू नका. त्यामुळे वेळेकडे लक्ष जाते. एका प्रकरणातील अमुक एवढय़ाच भागाचा अभ्यास करीन व ते लक्षात ठेवीन. मग ते ध्येय पूर्ण होईल. ध्येयपूर्तीचा आनंद उत्साह वाढवेल. क्षमतेप्रमाणे ध्येय साध्य करा. सोप्यापासून कठीणकडे वळा म्हणजे तुम्हाला जे हवे ते साध्य होईल. 4. ध्येय प्रेरित रहा स्वयंप्रेरणेने अभ्यास करा अभ्यास हा केवळ गुणांसाठी नसून तो आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी असतो. आई, बाबा, शिक्षक सांगतात म्हणून अभ्यास करू नका, तर स्वतःच्या इच्छेने अभ्यास करा. बाहेरून मिळणारी प्रेरणा काही काळ टिकते; पण स्वयंप्रेरणा ही कायमस्वरूपी शक्ती असते. स्वतःच्या स्वप्नांसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी अभ्यास केल्यास प्रत्येक दिवस उत्साहाने भरलेला वाटेल. 5. स्वतःशी प्रामाणिक रहा अभ्यासाच्या नावाखाली टाईमपास करू नका. पुस्तक उघडून दिवा स्वप्न बघू नका. कारण असं केलं तर तुम्ही स्वतःलाच फसवता. जर तुम्हाला परीक्षेत किंवा जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःशी प्रामाणिक रहा. मला खात्री आहे की, आता तुम्ही उत्साहाने अभ्यासाला बसाल. 6. संतुलित आहार पुरेशी झोप रोज संतुलित आहार करा व आठ तास पुरेशी झोप घ्या, प्राणायाम करा, अध्यात्मामुळे आपल्याला अभ्यासातच नाही, तर रोजच्या जीवनात पण फायदा होतो. 7. अभ्यासाची जागा वेळ तुमच्या घरात तुम्हाला ज्या जागी अभ्यास करायला आवडतो ती जागा निवडा. अभ्यासासाठी तुमच्या मनाने दिलेली वेळ निश्चित करा आणि नियमित त्याच वेळेला अभ्यासाला बसा. 8.आनंदाने, स्वखुशीने अभ्यास करा कोणतेही बहाणे न देता आनंदाने अभ्यास करा, तणावामध्ये अभ्यास करू नका, कंटाळा करत अभ्यास करू नका, तर आनंदाने अभ्यास करा. यश नक्कीच तुमचं असेल. असं म्हणतात, कितीही मोठं कुलूप एका छोटय़ा चावीने उघडू शकतो. तसेच यशाची जीवनातील आनंदाची चावी म्हणजे मनाची एकाग्रता. शरीर, मन, बुद्धी, आत्मा व विचार यांच्यातील संतुलन म्हणजे एकाग्रता. मनाच्या एकाग्रतेसाठी संगीत ऐका, नियमित व्यायाम करा, शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल राखा. त्यामुळे मन एकाग्र होईल. आळस झटका, कंटाळा दूर पळवा आणि तुम्ही निश्चित केलेले ईप्सित साध्य करा.

ध्येय मनाशी ठाम ठेवा, स्वप्नांना पंख द्या,

स्वयंप्रेरणेच्या ज्योतीने, यशाची वाट उजळा

कोणी सांगेल म्हणून नव्हे, स्वतःसाठी शिका,

प्रयत्नांच्या बळावरती, उंच शिखर गाठा ।।

(लेखिका श्रमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत.)

[email protected]