
विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. कोणीही कोणत्याही परिस्थितीत जोरजबरदस्तीने किंवा कोणाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत लांडीलबाडीने आमिषे दाखवत धर्मांतर करत असेल तर त्याला शिवसेनेचा विरोध आहेच, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट शब्दांत सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या विधेयकाबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, धर्मांतराबाबतचे विधेयक विधानसभेत मांडले गेले आहे. उद्या ते विधान परिषदेत मांडले जाणार आहे. त्याचा मसुदा आपण पाहिला आहे. धर्मस्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलेच पाहिजे.
टंचाईविरुध्द शिवसेना रस्त्यावर उतरणार का, असे माध्यमांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना जनतेच्या हक्कांसाठी आणि व्यथांसाठी लढण्यासाठी नेहमी तत्पर आहे. मात्र, आता जनतेनेही याविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे, जनतेने जागे होत सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. युद्धात नेमके काय सुरू आहे, सरकारची याबाबत काय भूमिका आहे, आपल्या देशावर त्याचे काय परिणाम होत आहेत, याची माहिती पंतप्रधान देणार आहेत की नाहीत? असा सवालही त्यांनी केला.
‘सालाबादप्रमाणे’ पुन्हा एकदा!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना विधानसभेत विरोधी पक्षाची निवड करण्यात यावी, असे स्मरण पत्र पुन्हा एकदा दिले. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, ‘नवे सरकार आल्यानंतर सालाबादप्रमाणे यंदाही अधिवेशनात दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेते नाहीत. त्यामुळे सालाबादप्रमाणे याची आठवण करून देण्यासाठी आपण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. याबाबत त्यांनी याची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती आपण त्यांना केली आहे. त्यांनीही सालाबादप्रमाणे नेहमीचे आश्वासन दिले आहे.’ सरकार विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी का घाबरत आहे? प्रचंड बहुमत असूनही त्यांना नेमकी कोणाची भीती वाटत आहे? असा थेट सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
बळजबरीच्या धर्मांतराला शिवसैनिक विरोध करतील
धर्मांतर झाले असेल तर ते कोणत्या समाजात, कोणत्या विभागात, कोणत्या प्रकारे धर्मांतर होतेय याची माहिती पटलावर ठेवली तर शिवसैनिकही तत्पर राहतील. कुणाच्या असहाय्यतेचा फायदा घेत धर्मांतर होत असेल तर शिवसैनिकही त्याला विरोध करतील, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होतेय. गेल्या काही वर्षांत भाजपचेच सरकार देशात आणि राज्यात आहे. भाजपचे सरकार असताना बळजबरीने किंवा फसवून धर्मांतराच्या संख्येत वाढ झाली असेल तर ते अपयश कोणाचे आहे, याचे उत्तर मिळाले पाहिजे.
गॅस सिलिंडरची टंचाई आणि महागाई या गोष्टी सरकारने समजून घेतल्या पाहिजेत. मोदींनी सांगितलेला गॅसनिर्मितीचा प्रयोगही लोकांनी करून पाहिला, पण फायदा झाला नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांना जनतेच्या व्यथा कळत नसतील तर राज्याचे भवितव्य कठीण
गॅस तुटवडय़ावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. एलपीजीचा तुटवडा नाही असे सरकार सांगत आहे, तर मग गॅस एजन्सीबाहेर रांगा का दिसत आहेत? मुंबईतीलच 30 ते 40 टक्के रेस्टॉरंट बंद झाली आहेत, अनेक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे जनता होरपळत असेल आणि जनतेच्या व्यथाच समजत नसतील किंवा समजूनही त्याकडे दुर्लक्ष करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला असेल, तर राज्याचे भवितव्य कठीण आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
बेळगावात मराठी माणसांवरील अन्याय सरकारने रोखावा
बेळगावात महाराष्ट्र गीत म्हटल्याने मराठी माणसांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. कोणत्याही भाषेवर कोणत्याही राज्यात दुसरी भाषा लादत अन्याय होऊ नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे कर्नाटक सीमा भागात मराठी भाषिकांवर अन्याय होत असेल तर सरकारने यात ठोस भूमिका घेण्याची गरज आहे. हा सीमावाद सोडवण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
धाकदपटशा दाखवणे, ईडी-इन्कमटॅक्स-सीबीआयच्या धमक्या देणे, पन्नास खोके देतो सांगणे असे करून कुणी धर्मांतर करत असेल तर त्याला शिवसेनेचा विरोध आहे. विधेयकात उल्लेख केलेल्या काही गोष्टींबाबत उत्तरे मिळणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.





























































