
अमेरिका व इस्रायलच्या चौफेर हल्ल्यांमुळे चवताळलेल्या इराणने सोमवारी पुन्हा एकदा दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य केले. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दुबई विमानतळावर ड्रोन हल्ला चढवला. हल्ल्यानंतर विमानतळावर आग लागल्यामुळे काही काळ येथील उड्डाणे स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, युएईच्या फुजैरा बंदरावर सलग दुसऱ्या दिवशी इराणने ड्रोन डागले.
ट्रम्प हतबल! ‘नाटो’ देशांना दमदाटी
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा ताबा घेऊन तेल व्यापाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतल्याने डोनाल्ड ट्रम्प हतबल झाले आहेत. हा मार्ग खुला करण्यासाठी ‘नाटो’ देशांनी युद्धनौका पाठवाव्यात असे आवाहन त्यांनी केले. मात्र, कुणीही प्रतिसाद न दिल्याने संतापलेल्या ट्रम्प यांनी दमदाटी सुरू केली आहे. ‘इराणविरोधात अमेरिकेला साथ न दिल्यास परिणाम वाईट होतील. नाटोचे भवितव्य कठीण असेल,’ अशी धमकी त्यांनी दिली आहे.



























































