
साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची सोमवारी घोषणा झाली. यामध्ये राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ आत्मकथनाला पुरस्कार जाहीर झाला. मराठी भाषेतून शिफारस करण्यात आलेल्या एकूण 11 पुस्तकांमधून बाविस्कर यांच्या आत्मचरित्राची निवड झाली. सन्मानचिन्ह, शाल आणि 1 लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 31 मार्च रोजी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात पुरस्कार प्रदान केले जातील.
साहित्य अकादमीने आज 24 भाषांमधील आपले वार्षिक पुरस्कार जाहीर केले. 2025 सालच्या या प्रतिष्ठत सन्मानासाठी आठ काव्यसंग्रह, चार कादंबऱ्या, सहा कथासंग्रह, दोन निबंधात्मक, एक साहित्य समीक्षा, एक आत्मचरित्र आणि दोन आठवणीपर पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.
चित्रकाराने रेखाटला वंचिताचा संघर्ष
मूळचे जळगावचे असलेले राजू बाविस्कर यांचे ‘काळ्यानिळ्या रेषा’ हे आत्मकथन गाजले आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून त्यात त्यांनी आपल्या चित्रकला प्रवासासोबतच वंचित वर्गातील संघर्षाचे चित्रण केले आहे. त्यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या पुस्तकाचा समावेश एमएच्या अभ्यासक्रमातही करण्यात आला आहे. बाविस्कर यांची चित्रकार म्हणूनही ओळख आहे. त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठs आणि रेखाचित्रे तयार केली आहेत.
तगडी स्पर्धा
राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्रासह वसंत दत्तात्रय यांचा ‘कोलाहल’ हा कवितासंग्रह, सतीश तांबे यांचा ‘काम तमाम अॅट वाघा बॉर्डर’ हा लघुकथा संग्रह, शरद बाविस्कर यांचे ‘भूरा’ हे आत्मचरित्र, अभिराम भडकमकर यांची ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी, रवींद्र इंगळे चावरेकर यांचा ‘सिंधुकालीन लिपी आणि भारतीय भाषांचे इतिहास’ हा भाषाशास्त्राrय ग्रंथ, देविदास फुलारी यांचा ‘रात्र भरत आहे’ हा कवितासंग्रह, बाबू बिरादार यांची ‘अधिवास’ ही कादंबरी, किशोर कदम सौमित्र यांचा ‘बाऊल’ हा कवितासंग्रह, रमेश डोंगरे यांचे ‘विंदांची कविता शैलिवैज्ञानिक विश्लेषण’ हे समीक्षण यांची शिफारस यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारांसाठी करण्यात आली होती.





























































