
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 रहिवाशांना आज घराच्या चाव्या देण्यात आल्या. गेल्या तीन ते चार पिढय़ांपासून 160 चौरस फुटांच्या लहानशा खोलीत राहणाऱया या रहिवाशांचा यंदाचा गुढीपाडवा 500 चौरस फुटांच्या आलिशान फ्लॅटमध्ये साजरा होणार आहे. अलिशान फ्लॅटमध्ये राहायला गेलो तरी चाळीतल्या त्या गोड आठवणी आम्ही कधीच विसरू शकणार नाही, अशी भावना यावेळी रहिवाशांनी व्यक्त केली.
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना आज नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले. म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 15593 पुनर्वसन घरांची 100 टक्के उभारणी पूर्ण करून या घरांचा ताबा डिसेंबर 2029 पर्यंत देण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
अभ्युदय नगर, आदर्श नगर, मोतीलाल नगर, जीटीबी नगर, एसव्हीपी नगर, कामाठीपुरा यांसारख्या भागांमध्येही पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. या माध्यमातून मुंबईत जवळपास एक हजार एकर क्षेत्रात पुनर्विकास होणार असून त्यामुळे मुंबईचे स्वरूप बदलून सर्वसामान्यांच्या जीवनमानात मोठा बदल घडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार देखील यावेळी उपस्थित होते.
एप्रिलमध्ये दुसऱ्या टप्प्यातील घरांचे वाटप
आज नायगाव येथील 864 घरांचा ताबा दिला जात असून दुसऱ्या टप्प्यात सुमारे 537 घरांचे एप्रिलमध्ये वितरण केले जाईल. तसेच वरळी येथील घरांचेही त्याचवेळी वितरण केले जाणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले. डिसेंबर अखेर 4888 घरांचे वितरण झालेले असेल असेही ते म्हणाले.
पोलिसांच्या घरासाठी समग्र धोरण
पोलिसांना हक्काचे घर मिळाले पाहिजे यासाठी लागणारे समग्र धोरण तयार करावे लागेल. 2016 मध्ये पोलिसांना मालकी हक्काचे घर मिळावे यासाठी धोरण आणले आहे, त्यामध्ये सुधारणा कशी करता येईल तसेच यासाठी कायदेशीर व्यवाहारिक मार्ग काढता येईल यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


























































