
मोठय़ा प्रमाणावर घोडेबाजाराच्या आरोपांच्या सावटात राज्यसभेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. त्यात बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एनडीएचे पाचही उमेदवार विजयी झाले. ओडिशामध्ये एनडीएने 3 आणि बीजेडीने एक जागा जिंकली. मात्र, हरयाणामध्ये काँग्रेस आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आल्यामुळे सुमारे 6 तास मतमोजणी थांबवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. राज्यसभेच्या 37 जागांसाठी यावेळी निवडणूक झाली. त्यापैकी 26 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी प्रत्येकी 44 मतांसह तर, रामनाथ ठाकूर आणि उपेंद्र कुशवाह यांनी प्रत्येकी 42 मतांसह विजय मिळवला. खरा ट्विस्ट पाचव्या जागेवर आला. भाजपचे शिवेश राम आणि आरजेडीचे ए. डी. सिंह यांच्यात लढत होती. शिवेश राम यांना पहिल्या पसंतीची 30 मते मिळाली होती. मात्र, दुसऱया पसंतीच्या मतांमुळे ते विजयी झाले. ए. डी. सिंह यांना पहिल्या पसंतीची 37 मते मिळाली होत. मात्र, महाआघाडीचे चार आमदार मतदानासाठी पोहोचलेच नाहीत. त्यामुळे शिवेश विजयी झाले.
ओडिशामध्ये भाजपचे मनमोहन सामल आणि सुजीत कुमार तसेच एनडीए समर्थित उमेदवार दिलीप राय तर, चौथ्या जागेवर बीजेडीचे संतृप्त मिश्रा हे विजयी झाले. काँग्रेसच्या आमदार सोफिया फिरदौस, रमेश जेना आणि दशरथी गोमांगो यांच्यावर क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप करण्यात आला.
महाराष्ट्रातून सात सदस्य राज्यसभेवर
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, भाजपचे विनोद तावडे, रामराव वडुकुटे, माया इवनाते, अजित पवार गटाचे पार्थ पवार, शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे आणि रिपाइंचे रामदास आठवले हे बिनविरोध राज्यसभेवर निवडून गेले आहेत.


























































