देशाच्या जिवावर क्रिकेटचा तमाशा, पाकिस्तानी खेळाडू खरेदीबाबत गावसकरांचा सनरायझर्सवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट हा खेळ असला तरी काही वेळा तो भावनांच्या सीमारेषा ओलांडतो. आणि त्या सीमारेषेच्या पलीकडे जे घडते ते फक्त खेळ राहत नाही. इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ टी-20 लीगमध्ये हिंदुस्थानी मालकीच्या सनरायझर्स लीड्स संघाने पाकिस्तानचा ‘मिस्ट्री’ फिरकीपटू अबरार अहमद याला तब्बल 2.34 कोटी रुपयांना खरेदी केले आणि क्रिकेटविश्वात वादळ उठले. या निर्णयावर हिंदुस्थानचे महान माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी अक्षरशः संताप व्यक्त करत सनरायझर्सच्या मालकांनाच सवाल केला. पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करणे म्हणजे देशवासीयांच्या जिवाशी खेळण्यासारखे असल्याचे गावसकर यांनी ठणकावून सांगितले.

लंडनमध्ये 13 मार्चला झालेल्या लिलावात हा व्यवहार झाला. सनरायझर्स समूहाकडे सनरायझर्स हैदराबाद आणि दक्षिण आफ्रिकेतील सनरायझर्स ईस्टर्न केप हे संघही आहेत. या समूहाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी काव्या मालन आहेत.

मुंबई हल्ल्यानंतर आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना बंदी

पाकिस्तानी खेळाडूंनी आायपीएलमध्ये  फक्त 2008 च्या पहिल्या हंगामात भाग घेतला होता. त्यानंतर मुंबईवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर कायमची बंदी घालण्यात आली. तेव्हापासून हिंदुस्थानी फ्रेंचायझी मालकांनी पाकिस्तानी खेळाडूंना पूर्णपणे दूर ठेवले आहे. मात्र, सनरायझर्सने ही भूमिका मोडीत काढत अबरारला संघात घेतल्याने संताप व्यक्त होत आहे.

व्हिट्टोरीला परिस्थिती कळली नसेल

सनरायझर्स लीड्सचा प्रशिक्षक डॅनियल व्हिट्टोरी हा न्यूझीलंडचा असल्याने त्याला हिंदुस्थान-पाकिस्तान तणावाची तीव्रता पूर्णपणे समजली नसेल, असे गावसकर म्हणाले. मात्र, संघाच्या मालकांनी ही संवेदनशीलता लक्षात घेऊन हा व्यवहार रोखायला हवा होता, असा टोला त्यांनी लगावला. ‘जगात फारसे कोणी खेळत नाही. अशा एका स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे देशवासीयांच्या जिवापेक्षा मोठे आहे का? असा थेट सवालही गावसकर यांनी उपस्थित केला.

बीसीसीआय म्हणते, हस्तक्षेप शक्य नाही

या वादावर ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले की, हा परदेशी लीगचा विषय असल्याने बोर्ड थेट हस्तक्षेप करू शकत नाही. अंतिम निर्णय फ्रेंचायझीचाच असेल.

या पैशातून शस्त्रs खरेदी होतात

गावसकर यांनी एका दैनिकातील आपल्या स्तंभात जोरदार शब्दांत लिहिले की, जेव्हा पाकिस्तानी खेळाडूंना मानधन दिले जाते आणि ते आपल्या देशात कर भरतात, तेव्हा तो पैसा त्यांच्या सरकारकडे जातो. त्या पैशातून शस्त्रs खरेदी होतात आणि त्याचा वापर अखेर हिंदुस्थानी सैनिक व नागरिकांवरच होऊ शकतो. अशाप्रकारे हिंदुस्थानकडून दिलेले पैसे अप्रत्यक्षपणे हिंदुस्थानींच्याच जिवावर उठणाऱया शस्त्रांसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हिंदुस्थानी संस्था पाकिस्तानी कलाकार व खेळाडूंना संधी देण्यापासून दूर राहतात, असे गावसकर यांनी स्पष्ट केले.

आणखी एक पाकिस्तानी

खेळाडू विकला

या लिलावात पाकिस्तानचा ‘मिस्ट्री’ फिरकीपटू उस्मान तारीकला बार्ंमगहॅम फिनिक्स संघाने सुमारे 1.72 कोटी रुपयांना विकत घेतले. मात्र वेगवान गोलंदाज रहीस रौफ आणि अष्टपैलू सैम अयूब यांना कोणत्याही संघाने पसंती दिली नाही.