
क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होणार असल्याने जागतिक क्रिकेटविश्वात उत्सुकता वाढली आहे. ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च जागतिक क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर तो आयुष्यातील मोठा सन्मान असेल. प्रत्येक खेळाडू आणि प्रशिक्षकासाठी ऑलिम्पिक हा अभिमानाचा क्षण असतो आणि त्या मंचावर देशासाठी योगदान देण्याची संधी मिळाली तर ती अविस्मरणीय ठरेल, अशी भावना हिंदुस्थानी पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने बोलून दाखवली.
कोलकात्यात आयोजित या एका कार्यक्रमात मोठय़ा सामन्यांबद्दल बोलताना गंभीर म्हणाला, सामना जितका मोठा असेल तितकी संघाची मानसिकता अधिक आक्रमक असायला हवी. निर्णायक क्षणी बचावात्मक खेळून चालत नाही. संघाने पूर्ण ताकदीने मैदानात उतरून प्रतिस्पर्ध्याला दबावाखाली ठेवणे आवश्यक असते, असे गंभीरने स्पष्ट केले.
संघनिवडीबाबत बोलताना तीन-चार सामने खराब गेले म्हणून एखाद्या खेळाडूवरचा विश्वास काढून घेणे योग्य नाही, असे मत व्यक्त करण्यात आले. कठीण काळातच खेळाडूंना पाठबळ देणे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे हे प्रशिक्षक व संघव्यवस्थापनाचे कर्तव्य असते, असे गंभीरने सांगितले.
निर्णय प्रक्रियेबद्दल बोलताना गंभीरने स्पष्ट केले की, प्रत्येक माणसाकडून चुका होऊ शकतात आणि प्रशिक्षकही त्याला अपवाद नाही, मात्र निर्णय घेताना हेतू स्वच्छ असणे सर्वात महत्त्वाचे असते. संघाच्या भल्यासाठी घेतलेला चुकीचा निर्णय स्वीकारता येतो; पण चुकीच्या हेतूने घेतलेला निर्णय कधीही स्वीकारार्ह नसतो, असे गंभीर आवर्जून म्हणाला. तसेच क्रिकेटमधील यशाबद्दल बोलताना गंभीरने संघाचा विजय हा एका खेळाडूचा नसतो, असे मत व्यक्त केले. ड्रेसिंगरूममधील प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच संघ मोठे यश मिळवतो आणि तीच खरी संघभावना असते.
टेस्ट क्रिकेटबद्दल बोलताना, लाल चेंडू क्रिकेटमध्ये बदल घडवणे हे पांढऱया चेंडूपेक्षा अधिक कठीण असते, असे नमूद करण्यात आले. तरीही योग्य दिशेने सातत्याने मेहनत घेतली तर हिंदुस्थान पुढेही मजबूत कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



























































