सिनर, सबालेंकाचे ऐतिहासिक जेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इटलीचा स्टार टेनिसपटू यानिक सिनर आणि बेलारूसची एरिना सबालेंका यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पार पडलेल्या इंडियाना वेल्स ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात यानिक सिनरने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत प्रथमच इंडियाना वेल्सचा किताब जिंकला. महिला एकेरीत अव्वल मानांकित एरिना सबालेंकाने दमदार पुनरागमन करत कझाकस्तानच्या एलेना रायबाकिना हिला नमवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

फेडररजोकोविचच्या खास क्लबमध्ये सिनर

या विजेतेपदासह यानिक सिनरने हार्ड कोर्टवरील सर्व मोठी विजेतेपदे आपल्या नावे केली आहेत. यात सहा एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धा, एटीएफ फायनल्स तसेच ऑस्ट्रेलिया ओपन व यूएस ओपन या ग्रँड स्लॅमचा समावेश आहे. यापूर्वी ही कामगिरी फक्त रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्या नावावर होती. सिनरने 2023 मध्ये टोरोंटो येथे पहिला मास्टर्स 1000 किताब जिंकला होता आणि अवघ्या तीन वर्षांत हार्डकोर्टवरील सर्व मोठे किताब जिंकण्याचा पराक्रम केला.

सिनरची सरळ सेटमध्ये बाजी

अंतिम सामन्यात सिनरने मेदवेदेवला 7-6 (8-6), 7-6 (7-4) अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. पहिला सेट टायब्रेकमध्ये जिंकत त्याने आघाडी घेतली आणि दुसऱया सेटमध्येही चुरशीच्या लढतीनंतर विजय मिळवला. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत सिनरने एकही सेट गमावला नाही आणि दमदार कामगिरी करत प्रथमच इंडियना वेल्स मास्टर्सचा किताब पटकावला.

सबालेंकाचे जेतेपदाचे स्वप्न साकार

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सबालेंकाने रायबाकिनाचा 3-6, 6-3, 7-6 (8-6) असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतरही सबालेंकाने जबरदस्त पुनरागमन केले. तिसऱया सेटमधील टायब्रेकमध्ये रायबाकिनाकडे चॅम्पियनशिप पॉइंट होता. मात्र, सबालेंकाने तो वाचवत अखेर विजय मिळवला. तिच्या कारकिर्दीतील हा पहिलाच इंडियान वेल्स किताब ठरला. 2023 मध्ये झालेल्या इंडियान वेल्सच्या अंतिम सामन्यात रायबाकिनानेच सबालेंकाला पराभूत करून किताब जिंकला होता. यंदा मात्र सबालेंकाने त्या पराभवाचा हिशोब चुकता करत विजेतेपदाचे स्वप्न अखेर साकार केले.