नवी मुंबईतील साडेतीन हजार कारखाने ‘गॅस’वर, ठाणे-बेलापूर; युद्धामुळे गॅस मिळेना; सहा लाख कामगारांवर कोसळणार बेकारीची कुऱ्हाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा मोठा फटका आता नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा, तळोजा औद्योगिक वसाहत आणि पाताळगंगा एमआयडीसीला बसला आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी असलेल्या गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे सुमारे साडेतीन हजार कारखान्यांमधील काम ठप्प झाले आहे. गेल्या आठवड्यापासून बहुतेक कारखान्यांतील कामगार बसून आहेत. इंजिनीयरिंग आणि फॅब्रिकेशनचे काम करणाऱ्या उद्योगांची पूर्णपणे वाताहत झाली आहे. हीच परिस्थिती जर आणखी काही दिवस राहिली तर या औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या सुमारे सहा लाख कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे

ठाणे-बेलापूर पट्टयातील औद्यागिक वसाहतीमध्ये सुमारे 200 कारखान्यांचे काम पूर्णपणे गॅसवर अवलंबून आहे. या कारखान्यांमध्ये स्टीलचे काम चालते. त्यामुळे प्रत्येक वेळी गॅसची गरज लागते. मात्र आखातात युद्ध सुरू झाल्यानंतर याकारखान्यांना होणारा गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. परिणामी गेल्या आठवड्यापासून या कारखान्यांमधील उत्पादन पूर्णपणे बंद झाले आहे. स्टील उद्योग वगळता अन्य कारखान्यांमध्येही काही प्रमाणात गॅसची गरज असते. मात्र गॅस उपलब्ध नसल्याने या कारखान्यांनाही अडचणीचा सामना करावा लागत आहे.

तळोजा एमआयडीसी हा केमिकल झोन म्हणून ओळखला जात असला तरी या वसाहतीमध्ये फॅब्रिकेशन आणि स्टील उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हे सर्वच उद्योग अडचणीत आले आहेत.

युद्धाचा फटका स्टील उद्योगांबरोबर प्लास्टिक उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. प्लास्टिकच्या वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक असलेले ग्रॅन्युएल पूर्वी 100 रुपये किलो या दराने मिळत होते. मात्र आता त्याचा किलोचा दर थेट 180 रुपयांपर्यंत गेला आहे.

रसद पूर्णपणे थांबली
पाताळगंगा एमआयडीसीमध्ये बहुतेक कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिक साहित्य तयार केले जाते. या मालाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. कच्च्या मालाची आयातही करावी लागत आहे. युद्ध सुरू झाल्यामुळे तयार मालाची निर्यात आणि कच्च्या मालाची आयात ठप्प झाली आहे. गॅसच्या टंचाईमुळे एमआयडीसीतील सर्वच कंपन्यांच्या कॅन्टीन जवळपास बंद झाल्या आहेत. कामगारांना मिळणारी रसद थांबल्यामुळे त्याचा उत्पादनावर विपरित परिणाम होणार आहे, अशी प्रतिक्रिया पाताळगंगा रासायनी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कदम यांनी व्यक्त केली आहे.

बंद केल्याशिवाय पर्याय नाही
सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. गॅस पुरवठा बंद झाल्याने कामगार गेल्या आठ दिवसांपासून कारखान्यांमध्ये बसून आहेत. जर हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर येत्या शनिवारपासून कंपन्या बंद करण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही. कारखानदारांनी घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करून देणे हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान ठरले आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबईत कारखानदारांचे नेतृत्व करणाऱ्या टीएमआयएचे अध्यक्ष के. आर. गोपी यांनी व्यक्त केली आहे.