
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण असताना प्रवाशांकडून टोल वसुली केली जात आहे. हा प्रकार कोकणवासीयांवर अन्याय करणारा असून सरकारने तातडीने ही टोलवसुली बंद करावी, अशी मागणी विधान परिषदेत शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केली.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या 84 किमी मार्गाचे चौपदरीकरण रुंदीकरण 2011 मध्ये सुरू झाले आहे. मात्र हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र या टप्प्यातील कोलाड, नागोठणे पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. असे असताना खारपाडा आणि खांब या ठिकाणचे टोलनाके येत्या आठवडाभरात सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रस्त्याचे काम पूर्ण झाले नसताना टोल आकारणी करू नका, अशी मागणी मिलिंद नार्वेकर यांनी केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले की, महामार्गावरील टोलचा निर्णय ‘नॅशनल हायवे’कडूनच घेतला जातो. एक टप्पा पूर्ण झाल्यावर महामार्गावर टोल आकारला जातो. हा धोरणात्मक निर्णय आहे. तरीदेखील नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आधीच्या मंत्र्यांकडून दिलेल्या आदेशांची शहानिशा करून टोलचा निर्णय पुढे ढकलता येतो का याबाबत निर्णय घेतला जाईल!






























































