
परळ येथील ग्लोबल रुग्णालयाने महानगरपालिकेच्या अटी व शर्तीनुसार 15 टक्के खाटा महानगरपालिकेच्या दराने राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र ग्लोबल रुग्णालयाने गेल्या 15 वर्षांत एकाही गरीब रुग्णावर उपचार केले नाहीत. त्यामुळे शिवसेना आमदारांनी या रुग्णालयाविरुद्ध विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून निषेध नोंदवला.
गेली चार वर्षे आमदार अजय चौधरी हे सातत्याने यासाठी प्रयत्न करत आहेत. महानगरपालिका वारंवार ग्लोबल रुग्णालयाला करार करण्यासंदर्भात नोटीस देते; परंतु रुग्णालय प्रशासन महानगरपालिकेच्या कोणत्याही नोटिसीला जुमानत नाही. अशा ग्लोबल रुग्णालयावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्यासह शिवसेना गटनेते भास्कर जाधव, सुनील प्रभू, बाळा नर, हारून खान, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, महेश सावंत, वरुण सरदेसाई, संजय पोतनीस, ज.मो. अभ्यंकर, गजानन लवटे यांनी जोरदार आंदोलन केले. भास्कर जाधव यांनी या आंदोलनाची माहिती दिल्यानंतर तालिका अध्यक्षांनी तातडीने सरकारने दखल घ्यावी, अशी सूचना दिली. त्यानुसार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः पायऱ्यांवरती येऊन आंदोलन करणाऱ्या आमदारांची भेट घेऊन तातडीने बैठक लावून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.





























































