ठाण्यात साखरपुडा, लग्नसोहळे रद्द; हॉटेलमालकांनी मांडली चूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इराण युद्धाच्या तणावातून निर्माण झालेल्या गॅसटंचाईमुळे ठाण्यातील हॉटेल मालकांवर चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे. घोडबंदर येथील एका प्रसिद्ध असलेल्या बँक्वेट हॉलबाहेर चूल पेटवून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना जेवण बनवून देण्यात येत आहे. ठाण्यात 50 टक्क्यांहून अधिक हॉटेल गॅस कमतरतेमुळे बंद असून कर्मचाऱ्यांसाठी बिर्याणी तसेच दाल खिचडीचा बेत आखण्यात येत आहे. स्वतः हॉटेल मालक चूल पेटवत स्वयंपाक करत आहेत. हॉटेल व्यावसायिकांकडून सरकारचा निषेध करत नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, लग्न व साखरपुड्याचे तसेच वाढदिवसांचे अनेक सोहळे रद्द करण्यात आले असल्याची माहिती ठाणे हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी दिली.

वागळे इस्टेटमधील पाच हजार लघुउद्योग संकटात
आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या पाश्र्वभूमीवर गॅसपुरवठा विस्कळीत झाल्याने याचा थेट परिणाम लघुउद्योगांवर होणार आहे. गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याअभावी वागळे इस्टेटमधील औद्योगिक क्षेत्रातील व्यवहार ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने या भागातील जवळपास पाच हजार कारखाने संकटात सापडले असून या कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ठाणे जिल्ह्यात 35 ते 40 हजार तर ठाणे शहरात चार हजारांवर उद्योग आहेत. उद्योग क्षेत्रात 15 लाखांहून अधिक कामगारांना रोजगार मिळतो. त्यामुळे या क्षेत्रात अडचणी आल्यास थेट रोजगारावर परिणाम होणार आहे. गॅसचा तुटवडा, कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ, इंधन दरातील चढ-उतार, वाहतूक व लॉजिस्टिक खर्च वाढणे तसेच निर्यात-आयात प्रक्रियेत होणारा विलंब यामुळे उद्योगांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत उद्योगांना कच्च्या मालाची उपलब्धता, वित्तीय सहाय्य आणि निर्यात प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आवश्यक ती उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत टीसाचे कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे यांनी व्यक्त केले.