
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेत इराणला कडक शब्दांत इशारा दिला आहे. इराणने अण्वस्त्रे मिळवली तर, ते केवळ इस्रायलसाठीच नव्हे तर संपूर्ण मध्य पूर्वेसाठी विनाशकारी ठरेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तेहराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत, असा ठाम निर्धार व्यक्त करतानाच त्यांनी इराणविरुद्ध करण्यात आलेल्या अलीकडील लष्करी कारवायांचे जोरदार समर्थन केले आहे.
जागतिक सुरक्षेसाठी इराणला अण्वस्त्रांपासून दूर ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. इराणच्या नेतृत्वावर टीका करताना ते म्हणाले की, तेथील शासन हिंसक आणि क्रूर असून त्यांनी गेल्या तीन आठवड्यांत तब्बल 32,000 लोकांना ठार केले आहे. अशा मानसिकतेच्या लोकांच्या हाती अण्वस्त्रे लागल्यास ते एका तासात किंवा एका दिवसात त्याचा वापर करतील आणि संपूर्ण प्रदेश उडवून देतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. आपल्याला युद्ध नको आहे. मात्र, सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचा दावा करताना ट्रम्प यांनी सांगितले की, गेल्या दोन आठवड्यांतील अमेरिकन कारवायांमुळे इराणची लष्करी क्षमता पूर्णपणे कोलमडली आहे. अमेरिकेने इराणचे नौदल, हवाई दल आणि विमानविरोधी यंत्रणांचे मोठे नुकसान करून त्यांना कमकुवत केले आहे. तसेच इराणचे नेतृत्वही या कारवायांमध्ये नष्ट झाले असून त्यांच्या लष्करी ताकदीला मोठा धक्का बसल्याचा दावा केला आहे.


























































