होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव वाढला; ‘टँकर स्वॅप’ नावाचा कुठलाही करार झाला नाही, केंद्र सरकारचा खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने इराणसोबत कथित “टँकर स्वॅप” कराराबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या स्पष्ट शब्दांत फेटाळल्या आहेत. भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी इराणशी अशा प्रकारची चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र केंद्र सरकारने हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचे सांगितले.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि इराण यांच्यात अशा स्वरूपाच्या कोणत्याही चर्चाच झालेल्या नाहीत. “हा अहवाल निराधार आहे. भारतीय आणि इराणी अधिकाऱ्यांमध्ये अशा प्रकारची कोणतीही चर्चा झालेली नाही. संबंधित तीन जहाजेही इराणच्या मालकीची नाहीत,” असे स्पष्ट करण्यात आले.

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील अत्यंत महत्त्वाची ऊर्जा वाहतूक मार्गिका मानली जाते. सध्या ती बंद असून इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)च्या प्रभावाखाली असल्याचे मानले जाते. त्यामुळे या भागातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. भारत या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

काही माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, भारताने जप्त केलेल्या तीन टँकर्सची सुटका करण्याच्या बदल्यात इराण भारताशी संबंधित किंवा भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यास तयार आहे.

या अहवालांनुसार ‘Asphalt Star’, ‘Al Jafzia’ आणि ‘Stellar Ruby’ ही तीन जहाजे भारताने फेब्रुवारी महिन्यात जप्त केली होती. या जहाजांनी समुद्रात बेकायदेशीर “शिप-टू-शिप” व्यवहार करण्यासाठी आपली ओळख लपवली किंवा बदलली होती, असा अफवा होती.

माहितीनुसार ‘Stellar Ruby’ हे जहाज इराणी ध्वजाखाली नोंदणीकृत असल्याचा दावा करण्यात आला होता, तर इतर दोन जहाजे निकाराग्वा आणि माली या देशांच्या ध्वजाखाली असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, या कथित चर्चांच्या भाग म्हणून इराणकडून काही विशिष्ट औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा मागितला जात असल्याची माहितीही काही अहवालांमध्ये देण्यात आली होती.

मात्र केंद्र सरकारने या सर्व दाव्यांना ठाम नकार देत अशा कोणत्याही कराराबाबत चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव लक्षात घेता भारत परिस्थितीवर सातत्याने नजर ठेवून असल्याचेही सरकारने सांगितले.