
मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पुढील दोन दिवस (18 आणि 19 मार्च) मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या विभागांसाठी कोणताही विशेष अलर्ट जारी केला केला नसला तरी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या उर्वरीत भागांत पुढील चार ते पाच दिवस उन्हाळ्याची तीव्रता मध्यम स्वरूपाची राहील. विदर्भातील काही भागांत पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हवामान उष्ण आणि दमट राहील. दिवसा तापमानात फारशी वाढ होणार नसली, तरी रात्री तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
मार्चच्या सुरुवातीलाच मुंबईत उष्णतेच्या लाटेचे तीन इशारे जारी करण्यात आले होते. 10 मार्च रोजी मुंबईचे तापमान 40 अंशांवर पोहोचले होते, जे गेल्या पाच वर्षांतील मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान होते. गेल्या आठवड्याच्या अखेरीस उपनगरीय भागात सायंकाळचे तापमान 31 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या काही दिवसांपासून तापमानात थोडी घट झाली असली, तरी आता पावसाळी वातावरणामुळे आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे.



























































