अजितदादांच्या विमानाचा black box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? रोहित पवार यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी अजितदादांच्या विमानाचा black box सुरक्षित असतानाही जळाल्याचं का सांगितलं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीचा संदर्भ देत केंद्रीय मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. X वरून त्यांनी एक पोस्ट शेअर करत केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्यावर निशाणा साधला.

”अजितदादांच्या विमान अपघाताच्या संवेदनशील विषयावर केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांनी दिलेलं थातुरमातूर आणि वेळ मारून नेणारं उत्तर संपूर्ण देशाने बघितलं. पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय निकषानुसार तपास सुरू असल्याचं सांगणाऱ्या मंत्र्यांनी बारामती दुर्घटनेतील ब्लॅकबॉक्स सुरक्षित असतानाही black box जळाल्याचं का सांगितलं? आणि अमेरिकन एजन्सी अहमदाबाद अपघाताबद्दल माहिती मागत असतानाही माहिती का दिली जात नाही? याची उत्तरं द्यावीत”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच VSR कंपनी सोबत आर्थिक संबंध असणाऱ्या VSR च्या मालकाच्या मुलाच्या लग्नात पाहुणचार करून आलेल्या आणि मिठाला जागणाऱ्या केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्याकडून अपेक्षा तरी कशी करणार? अशी जोरदार टीका त्यांनी केंद्रीय मंत्री नायडू यांच्यावर केली. यासोबतच काँग्रेससह INDIA आघाडीतील मित्रपक्ष हा विषय प्रभावीपणे मांडतीलच, असा विश्वास त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केला.