
डहाणू तालुक्यातील कासा परिसरातील भटक्या कुत्र्यांना ‘कॅनाइन डिस्टेंपर’ या विषाणूजन्य आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे भटक्या कुत्र्यांच्या नाक व डोळ्यांतून स्राव येणे, डोळे बंद होणे, शरीर अशक्त होणे तसेच पाय कडक होणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. प्राणीमित्रांनी स्वखर्चाने भटक्या कुत्र्यांवर उपचार केले. कासा परिसरातील २० ते २५ भटक्या कुत्र्यांना या आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यावर प्राणीमित्र सनी गवळी, यतीश पुजारी, लतीश पुजारी, अंकित केणी, तुषार केणी, अमन केणी आणि जितू पाटील यांनी स्वखर्चाने औषधे खरेदी करून उपचार केले आहेत. त्यापैकी काही श्वानांची प्रकृती सुधारल्याची माहिती प्राणीमित्रांनी दिली. या कामात पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सचिन वेडगा यांनी मोलाचे सहकार्य केले. वेळ-काळ न पाहता जखमी किंवा आजारी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ते तत्पर असतात. कोणतेही शुल्क न आकारता ते भटक्या प्राण्यांवर मोफत उपचार करत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
लसीकरण गरजेचे
कॅनाइन डिस्टेंपर हा कुत्र्यांमध्ये आढळणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर कुत्र्यांमध्ये नाक-डोळ्यांतून स्राव येणे, अशक्तपणा तसेच न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे पाळीव कुत्र्यांचे वेळेत लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच परिसरात आजारी किंवा जखमी भटके कुत्रे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ प्राणीमित्र किंवा पशुवैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधावा असे पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सचिन वेडगा यांनी सांगितले.




























































