
देशभरात एलपीजी (गॅस) पुरवठा सुरक्षित आणि सुरळीत असल्याची खात्री इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IndianOil)ने दिली आहे. काही ग्राहकांकडून वेळेपूर्वी गॅस बुकिंग केल्यामुळे तात्पुरती मागणी वाढत असून वितरणावर परिणाम होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमावर इंडियन ऑइलने म्हटले आहे की, “एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आणि अखंड सुरू आहे. मात्र काही ग्राहक गरजेपूर्वीच बुकिंग करत असल्याने तात्पुरती मागणी वाढते आणि डिलिव्हरीच्या वेळापत्रकावर परिणाम होतो.”
कंपनीने ग्राहकांना विनंती केली आहे की, आवश्यकतेनुसारच गॅस बुकिंग करावे आणि घाबरून (panic booking) बुकिंग टाळावे. “आपली छोटी काळजी मोठा फरक करू शकते. योग्य वेळीच बुकिंग केल्यास सर्वांना वेळेवर सिलेंडर मिळण्यास मदत होईल,” असे इंडियन ऑइलने सांगितले.
दरम्यान, पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला असून कच्चे तेल आणि एलपीजी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले की, एलपीजी पुरवठ्याबाबत कोणतीही गंभीर अडचण नाही. “सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून पर्यायी उपायही शोधले जात आहेत. सामान्य नागरिकांवर याचा परिणाम होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,” असे त्यांनी सांगितले.
सरकारच्या माहितीनुसार, सध्याच्या भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी पुरवठ्यावर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. देशांतर्गत एलपीजी उत्पादनात सुमारे 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Your LPG supply remains secure and uninterrupted.
IndianOil continues to ensure steady LPG availability for households across the country.
We understand that some customers may be booking refills earlier than usual. However, advance or panic bookings can temporarily increase… pic.twitter.com/PaNjbA6dpg
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) March 17, 2026
तसेच, ऑनलाईन गॅस बुकिंगमध्येही वाढ झाली असून ती 84 टक्क्यांवरून जवळपास 90 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारांकडूनही कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एकूणच, एलपीजीचा पुरवठा सुरळीत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेनुसारच गॅस बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



























































