
हिंदुस्थानात सध्याच्या घडीला सायबर फसवणुकीमध्ये दिवसागणिक वाढ होऊ लागली आहे. नुकताच Meta च्या 2026 च्या नव्या अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. हिंदुस्थान हा जगातील सायबर फसवणुकीसाठी सर्वाधिक लक्ष्य बनलेल्या देशांपैकी एक आहे. यामध्ये प्रामुख्याने AI चा वापर करुन स्कॅम्स मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत. अहवालानुसार, हिंदुस्थानात इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. तसेच झपाट्याने वाढणारे AI चे प्रस्थ यामुळे सायबर स्कॅम्स मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत.
जगभरात अमेरिकेनंतर हिंदुस्थान हा सर्वाधिक टार्गेट होणाऱ्या देशांमध्ये आहे. सायबर स्कॅम्स अंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे. त्याचबरोबरीने संघटित गुन्हेगारी टोळ्या बिझनेस मॉडेलसारखे स्कॅम चालवत आहेत. Meta च्या रिपोर्टनुसार सध्याच्या घडीला AI चा वापर हा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळेच स्कॅम्सची चिंताही फार वाढताना दिसत आहे.
AI च्या मदतीने खोटे संभाषण, ईमेल, वेबसाइट्स तयार केली जात आहे. तसेच वेगवेगळ्या भाषांमध्ये सहज फसवणूक संदेश तयार केले जाऊ लागले आहेत. त्याचबरोबर पूर्ण “फेक बिझनेस सिस्टम” उभी करून लोकांना फसवले जाते. त्यामुळेच आता AI च्या माध्यमातून होणारे स्कॅम्स ओळखणे महत् कठीण होऊ लागले आहे. अहवालामध्ये उल्लेख केल्यानुसार न्युडीफाय अॅप्स नावाच्या AI टूल्सबाबत आता गंभीर इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या अॅप्सद्वारे एखाद्याचे बनावट अश्लील फोटो/व्हिडिओ सहज सुलभपणे तयार केले जातात. डीपफेक तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक धोकादायक बनले आहे. त्यामुळेच Meta च्या तपासात असेही आढळले की, काही सायबर ऑपरेशन्स इराण, पाकिस्तान, रशिया आणि चीनसारख्या देशांशी संबंधित नेटवर्कमधून चालवले जात आहेत.
तज्ज्ञांच्या मते, यासंदर्भात केवळ कडक स्वरुपाचे कायदे करुन भागणार नाही. तर याकरता सर्वांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणे अत्यावश्यक आहे. केवळ इथेच थांबून चालणार नाही तर, AIआधारित फसवणुकीसाठी नवीन कायदे करणेही आता तितकेच गरजेचे झाले आहे.


























































