काबूलमधील कथित हवाई हल्ल्यावर हिंदुस्थानची तीव्र प्रतिक्रिया; ‘अमानुष आणि निंदनीय’ ठरवत आंतरराष्ट्रीय कारवाईची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काबूलमध्ये झालेल्या कथित हवाई हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानवर तीव्र टीका करत या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यास “अमानुष, भ्याड आणि निंदनीय” कृत्य ठरवत आंतरराष्ट्रीय समुदायाने जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, 16 मार्चच्या रात्री काबूलमधील ‘ओमिद अ‍ॅडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल’वर झालेला हल्ला हा कोणत्याही परिस्थितीत योग्य ठरू शकत नाही. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. मंत्रालयाने नमूद केले की, संबंधित रुग्णालय हे पूर्णपणे नागरी स्वरूपाचे असून ते कोणत्याही प्रकारे लष्करी लक्ष्य मानले जाऊ शकत नाही. तसेच पाकिस्तान या हल्ल्याला लष्करी कारवाई म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

हिंदुस्थानने या घटनेला अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला असल्याचे म्हटले असून, यामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य धोक्यात येत असल्याचे स्पष्ट केले. हा प्रकार पाकिस्तानच्या बेफिकीर आणि बेजबाबदार भूमिकेचे उदाहरण असल्याचेही नमूद करण्यात आले.

तसेच, आपल्या अंतर्गत समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान सीमापार हिंसाचाराचा मार्ग स्वीकारत असल्याचा आरोप करत ही घटना त्याच प्रवृत्तीचा भाग असल्याचे हिंदुस्थानने म्हटले.

परराष्ट्र मंत्रालयाने विशेषतः नमूद केले की, रमजानसारख्या पवित्र महिन्यात अशा प्रकारचा हल्ला होणे अधिकच निंदनीय आहे. हा काळ शांतता, संयम आणि करुणेचा असतो, अशा वेळी रुग्णालय आणि रुग्णांना लक्ष्य करणे कोणत्याही धर्म किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत योग्य नाही.

हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केले आहे की, या घटनेतील दोषींना जबाबदार धरण्यात यावे आणि अफगाणिस्तानमध्ये नागरिकांवर होणारे हल्ले तात्काळ थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत.

याशिवाय, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती हिंदुस्थानने शोक व्यक्त केला असून जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे. तसेच या कठीण काळात अफगाणिस्तानच्या जनतेसोबत ऐक्य दर्शवत त्यांच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा देण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे.