
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेता, एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय विमान सेवेचा विस्तार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १९ मार्चपासून एअर इंडिया युरोप आणि उत्तर अमेरिकेतील प्रमुख शहरांसाठी ३६ अतिरिक्त साप्ताहिक विमान फेऱ्या सुरू करणार आहे. यामुळे परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, या अतिरिक्त फेऱ्यांमुळे अमेरिका आणि युरोपमधील महत्त्वाच्या शहरांशी हिंदुस्थानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल. यामध्ये प्रामुख्याने लंडन, बर्मिंगहॅम, मिलान, व्हिएन्ना आणि सॅन फ्रान्सिस्को यांसारख्या शहरांचा समावेश आहे.
- युरोप: लंडन (हिथ्रो) साठी दर आठवड्याला १४ अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तसेच बर्मिंगहॅम, मिलान आणि व्हिएन्नासाठीही विमान फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.
- उत्तर अमेरिका: सॅन फ्रान्सिस्कोसाठी दर आठवड्याला ६ अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत, ज्यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.
प्रवाशांना होणार फायदा
उन्हाळी हंगामात (Summer Schedule) जगभरातून विमानांच्या तिकिटांची मागणी प्रचंड वाढते. हे लक्षात घेऊन एअर इंडियाने आपल्या ताफ्यातील बोईंग ७७७ आणि बोईंग ७८७ (ड्रीमलायनर) या विमानांचा वापर करून ही क्षमता वाढवली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील आणि ऐनवेळी होणारी तिकीट दरवाढ काही प्रमाणात नियंत्रणात राहण्यास मदत होईल.


























































