
“देशात सध्या एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून सामान्य जनता हवालदिल झाली आहे. मात्र या गंभीर संकटाच्या काळात सर्वपक्षीय बैठक बोलावून तोडगा काढण्याऐवजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत,” अशी जळजळीत टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत केली.
राज्यसभेत द अप्रोप्रिएशन बिल (The Appropriation Bill) वरील चर्चेदरम्यान बोलताना संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. “सरकारला संचित निधीतून २.८१ लाख कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी हवी आहे, पण हा पैसा १४० कोटी जनतेसाठी खर्च होतोय की, काही मोजक्या मित्रांसाठी, याचा हिशोब मागण्याचा अधिकार जनतेला आहे.”
गॅस टंचाईची दाहकता मांडताना राऊत म्हणाले की, “काशीमधील ३५ वर्षांपासून अविरत सुरू असलेली अन्नपूर्णा महामंदिराची रसोई केवळ गॅसअभावी बंद पडली आहे. जिथे १५ हजार लोक रोज अन्नछत्राचा लाभ घ्यायचे, तिथे आता टाळे लागले आहे. शिर्डीत साईप्रसादाच्या दोन लाडूंच्या जागी आता केवळ एकच लाडू दिला जातोय, तर प्रसादाच्या थाळीतही कपात करण्यात आली आहे.”
ते म्हणाले की, “मुंबईत दररोज २० लाख वडापाव विकले जात होते, पण गॅसच्या टंचाईमुळे हा आकडा ५ लाखांवर आला आहे. यामुळे हजारो गाड्यावाल्यांच्या रोजगारावर संक्रांत आली असून त्यांचे कुटुंब चालवणे कठीण झाले आहे.”
संजय राऊत पुढे म्हणाले की, “चीन किंवा अमेरिकेची जनता गॅसच्या रांगेत उभी नाही, तर हिंदुस्थानी जनता रांगेत उभी आहे. रुपया कमकुवत होत असून बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्रात १७ शेतकऱ्यांनी कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकल्याची धक्कादायक नोंद आहे. हे भीषण वास्तव असताना पंतप्रधान दिल्लीत बसून परिस्थिती हाताळण्याऐवजी रॅलीमध्ये व्यग्र आहेत.”


























































