
देशाची ऐतिहासिक वारसा असलेल्या जुन्या संसद भवनाच्या छताला आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. टीव्ही९ भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, संसदेच्या छतावर दुरुस्तीसाठी वेल्डिंगचे काम सुरू असताना ठिणगी उडून ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या संसद भवनाच्या वरच्या भागात काही देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी लोखंडी सळ्यांचे वेल्डिंग करताना उडालेली ठिणगी छतावरील ज्वलनशील साहित्यावर पडली आणि आगीने रौद्र रूप धारण केले. छतावरून धुराचे लोट निघताना दिसताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
आग लागल्याचे समजताच संसद भवनातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत इमारतीचे काही अंशी नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


























































