वासनांध कीर्तनकार ‘महाराजा’च्या निषेधार्थ ढवळपुरीत कडकडीत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अल्पवयीन मुलीवर पाच वर्षांपासून अत्याचार करून तिला गरम लोखंडी पकडीने चटके देणाऱ्या ‘श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थे’चे अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याच्या निषेधार्थ आज पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर महाराजाचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी नराधम महाराजाला कडक शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.

‘श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थे’चा अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात ऊर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने 17 वर्षीय मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून अमानुष अत्याचार केल्याचे समोर येताच प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या नराधम महाराजाने पीडितेचे केवळ लैंगिक शोषणच करण्याबरोबरच तिला गरम लोखंडी पकडीने चटके देऊन तिचा शारीरिक छळही केला. या क्रूर कृत्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी आज सकाळी ग्रामपंचायतीसमोर महाराजाच्या पुतळ्याचे दहन केले.

सरपंच नंदाताई गावडे म्हणाल्या, ‘ज्या हातांनी मुलांवर संस्कार करायचे असतात, त्याच हातांनी एका निरागस मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हे अत्यंत नीच कृत्य आहे. अशा भोंदू महाराजांना समाजात कोणतेही स्थान नसावे आणि कायद्याने त्याला कठोर शासन करा,’ अशी मागणी त्यांनी केली. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनीही तीक्र संताप व्यक्त करत, ‘अशा नराधमाला भरचौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे,’ अशी मागणी केली. या घटनेमुळे वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत, ‘आरोपीला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये,’ अशी मागणी तरुणांनी केली.

या घटनेने पारनेर तालुक्यात दुकाने आणि व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून ग्रामस्थांनी पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी रविवारी पहाटेच आरोपीला अटक केली आहे.