
ऐनवेळी काँग्रेसने माघार घेतल्याने आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अजित पवार गटाच्या शिल्पा खोत, तर उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्यांची विशेष सभा झाली.
जिल्हा परिषद निवडणुकीत संख्याबळानुसार अजित पवार गटाच्या जादा जागा निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून अध्यक्षपदाचा दावा करण्यात आला होता; पण भाजपनेही जनसुराज्य आणि आपण एकच असल्याचे सांगत, अध्यक्षपदासाठी दावा केल्याने शेवटपर्यंत महायुतीतच अस्वस्थता दिसून येत होती. रविवारी पद वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतरही पहिला अध्यक्ष कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, आज सकाळी 10 ते 12 या वेळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत अध्यक्षपदासाठी अजित पवार गटाच्या शिल्पा खोत व उपाध्यक्षपदासाठी भाजपचे तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच अखेर संभ्रमावस्था दूर झाली. तर विरोधी काँग्रेस आघाडीकडून अध्यक्षपदासाठी रसिका पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटणकर यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते.
जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता सभेला सुरुवात झाली. माघार घेण्याच्या मुदतीत सत्ताधारी आघाडीच्या आवाहनाला प्रतिसाद देत विरोधी काँग्रेस आघाडीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यामुळे जि. प.च्या अध्यक्षपदी सेनापती कापशी येथील शिल्पा खोत आणि उपाध्यक्षपदी गडमुडशिंगी येथील तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली.जिल्हाधिकारी येडगे, जि.प.चे सीईओ कार्तिकेयन एस. तसेच नवनिर्वाचित सदस्यांकडून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे अभिनंदन करण्यात आले.





























































