भाजपच्या उपनगराध्यक्षांसह कोपरगावात दहाजणांवर गुन्हा, बंदी आदेशाचे उल्लंघन करत पोलीस ठाण्यासमोर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मळेगाव थडी येथील घटनेच्या निषेधार्थ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी कोपरगाव नगरपालिकेतील भाजपचे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मेहमूद सय्यद यांच्यासह नऊ जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी कॉन्स्टेबल राम गोरक्षनाथ खारतोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर जमाव करून गोंधळ घालणे, तसेच प्रशासनाने घातलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करणे, या स्वरूपाचे आरोप गुह्यात नमूद करण्यात आले आहेत.

आरोपींमध्ये जितेंद्र रणशुर, विजय त्रिभुवण, अनिल रणनवरे, विनोद भोसले (रा. निफाड), प्रकाश दुशिंग, इब्राईम उर्फ मुन्नाभाई शेख (रा. मायगाव देवी), मंगेश औताडे (रा. कोळपेवाडी), उत्तम पवार (रा. चांदेकसारे) आणि मेहमूद मन्वर सय्यद (रा. कोपरगाव) यांचा समावेश आहे.

16 मार्चला सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास या सर्वांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळील पायऱ्यांवर जमून आंदोलन केले. यावेळी पोलीस निरीक्षकांच्या कथित पक्षपाती भूमिकेविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान ‘संदीप कोळी हाय हाय’, ‘दांडा लेके हल्ला बोल, काठी लेके हल्ला बोल’, अशा घोषणा देत हुल्लडबाजी केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तसेच पोलीस ठाण्यात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचा रस्ता अडविल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.