
इराणमध्ये सध्या संतापाची लाट मोठ्या प्रमाणात उसळली आहे. अली लारीजानी आणि त्यांचा मुलगा मोर्तेझा लारीजानी यांच्या पार्थिवाचा पहिला फोटो समोर आला आहे. इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात या दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही नेत्यांच्या शवपेट्या एकत्र ठेवल्या असून, घडलेल्या या घटनेने इराणमध्ये संतापाचे वातावरण आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अली लारीजानी हे सचिव होते. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यावेळी ते परदिसमध्ये त्यांच्या मुलीच्या घरी होते. या हल्ल्यात त्यांचा मुलगा मोर्तेझा याचाही मृत्यू झाला. फोटोंमध्ये लारीजानी यांचा मृतदेह त्यांच्या मुलाच्या मृतदेहाशेजारीच ठेवलेला दिसत आहे.
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या मुलीच्या घराला लक्ष्य करण्यात आले होते. या थेट केलेल्या हल्ल्यामुळे, इराण आता पेटून उठले आहे.
इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, लारीजानी यांचे तेहरानच्या ईशान्येकडील परदिस येथे पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा, मोर्तेझा लारीजानी, त्यांचे सुरक्षा विभागाचे उपप्रमुख, अलीरेझा बायात आणि अनेक अंगरक्षक होते. सुरक्षा परिषदेने एका निवेदनात, त्यांना इस्लामिक प्रजासत्ताकाचे आजीवन सेवक असे संबोधले आणि म्हटले की, सकाळच्या वेळी ते, त्यांचे पुत्र मोर्तेझा, अलीरेझा बायात आणि अनेक अंगरक्षकांसह शहीद झाले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी यापूर्वी म्हटले होते की, इस्रायली हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या वरिष्ठ व्यक्तींपैकी लारीजानी एक होते.
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत असताना इराणचे प्रभावशाली नेते अली लारिजानी यांच्या मृत्यूनंतर आता त्यांच्या मृतदेहाचा पहिला फोटो समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे देशभरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


























































