101 व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

101 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी भूषवणार आहेत. नाट्य परिषद नियामक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत संमेलनाध्यक्ष म्हणून मोहन जोशी यांच्या नावाची एकमताने निवड झाली. हे शतकोत्तर ऐतिहासिक नाट्यसंमेलन बोरिवली येथे होणार आहे.

मोहन जोशी यांनी आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत आपला ठसा उमटवला आहे. नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. आता नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान त्यांना मिळाला आहे.

101 वे नाटय़संमेलन मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवडय़ात बोरिवली येथे होईल. नाटय़ परिषदेच्या बोरिवली शाखेतर्फे त्याचे आयोजन होईल, अशी माहिती नाटय़ परिषदेचे प्रमुख कार्यवाहक अजित भुरे यांनी दिली.

रत्नागिरीत 101 व्या नाट्यसंमेलनाची सांगता

100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. मात्र या ऐतिहासिक नाटय़संमेलनाची सांगता अद्याप झालेली नाही. त्याला अखेर मुहूर्त सापडला आहे. शंभराव्या  नाट्यसंमेलनाचा सांगता सोहळा येत्या 24 ते 26 एप्रिलदरम्यान रत्नागिरी येथे होणार आहे, अशी माहिती नाटय़ परिषदेतर्फे देण्यात आली. कोकणच्या भूमीत होणाऱ्या या सोहळय़ात दिग्गज कलाकार आणि रंगकर्मी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

मी 13 वर्षे नाट्य परिषदेचा अध्यक्ष होतो. या काळात 13 नाटय़संमलने झाली.  संमेलनाशी मी अगदी जवळून जोडला गेलेलो आहे. नाट्यक्षेत्रात प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर नाटय़संमेलनाध्यक्ष व्हावे ही माझी इच्छा होतीच. ती आता पूर्ण होतेय. खूप आनंद वाटतोय. आता नव्याने नाटय़क्षेत्राशी जोडला जाणार आहे. या क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. बॅकस्टेज कामगारांचे विषय आहेत. अशा अनेक मुद्दय़ांवर एकत्र येऊन काम करावे लागेल.  – मोहन जोशी