
राजकीय नेत्यांचा बहुचर्चित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या वासनाकांडाचे तब्बल शंभरहून अधिक अश्लिल व्हिडीओ तपासी पथकाच्या हाती आले आहेत. महिलांच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत धमकावून त्याने हे काळे कारनामे केल्याचे समोर येत आहे. अहिल्यानगर जिह्यात शिर्डी, कोपरगाव, राहता येथेही त्याची मालमत्ता आढळून आली आहे. देश-विदेशातही संपत्ती असल्याचा संशय असल्याने नामी-बेनामीसह एकूण संपत्ती हजार कोटीच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. यामुळे छुपी भागिदारी असणाऱया नेत्यांसह संबंधितांचे धाबे दणाणले आहे.
आधी विवाह मोडण्याची व विवाहानंतर पतीचा मृत्यू होण्याची भीती घालून, गुंगीचे पाणी पाजून अशोक खरातने वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून तो पोलीस कोठडीत आहे. तेजस्वी सातपुते या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नाशिक शहर परिसरात, सिन्नर, मिरगाव भागात बाजारभावानुसार खरातकडे तीनशे कोटींची मालमत्ता सापडली होती. आता अहिल्यानगर जिह्यातील कोपरगाव, राहता, शिर्डी या भागात शेती, भूखंड अशी शेकडो कोटींची संपत्ती मिळून आली आहे. खरात हा सातत्याने विदेश दौरे करीत होता. विदेशात तसेच महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरांमध्ये त्याची संपत्ती असल्याचा तपासी पथकाला संशय असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.
दोन लॅपटॉप, आठ लाख जप्त
खरातच्या घरातून दोन लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. यात राजकीय नेत्यांबरोबरचे फोटो, व्हिडीओ, तसेच आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचे समजते. घरझडतीत आठ लाखांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. लॅपटॉपमधील रहस्यमय माहितीमुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढणार आहे.
तू मागच्या जन्मातील माझी राधा..
वासनेची शिकार करताना ‘मी तुझा कृष्ण आहे, तू मागच्या जन्मातील माझी राधा आहे’, असे महिलांच्या कानात पुटपुटायचा, डोक्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा लोटा ठेवून त्यांना देवाचे नामस्मरण करायला लावायचा, त्याचवेळी तो महिलांशी अश्लिल चाळे करायचा. त्यापूर्वी कडवट पदार्थ खायला द्यायचा, गुंगी आली की वासना भागवायचा, असे पीडित महिलेने तपासी पथकाला सांगितले.
कोह्याची शिंगे अन् कस्तुरी
खरातचे नाशिक कार्यालय, निवासस्थान, मिरगाव येथील मंदिर येथे अनेक उच्चभ्रू व्यक्ती जायचे. त्यांची इच्छीत कामे व्हावीत, यासाठी तो त्यांना वेड्यात काढायचा. कोह्याला शिंगे असतात, ती फक्त माझ्याकडे आहेत, असे सांगून तो कुठल्यातरी प्राण्याची शिंगे द्यायचा. घरे व स्वतःच्या जमिनी, प्लॉटमध्ये ते पुरण्यास सांगायचा, अनेकांना घरात ठेवण्यासाठी कस्तुरी द्यायचा, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विशेष तपास पथकाला दिली आहे.






























































