
दिवसभर लोकल सेवेचे वेळापत्रक योग्य प्रकारे हाताळू न शकणाऱया मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी रात्री प्रवाशांना ‘अंधारात’ ठेवून ब्लॉक घेतला. परळ स्थानकातील एल्फिन्स्टन पुलाचा सांगाडा हटवण्यासाठी रात्री 4 तास 5 मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला. या काळात काही गाडय़ा रद्द, तर काही गाडय़ांचा प्रवास अर्ध्यावर खंडित केल्याने रात्री उशिराची डय़ुटी करून घरी परतणाऱया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. ब्लॉकबाबत पुरेशी आगाऊ सूचना वा रेल्वे स्थानकांत अनाऊन्समेंट न करता गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम मागील चार महिन्यांपासून रेंगाळले आहे. मध्य रेल्वेकडून मोठय़ा ब्लॉकला मंजुरी मिळत नसल्याने पुलाचे पाडकाम पूर्ण झालेले नाही. अशातच गुरुवारी रात्री 11.40 ते पहाटे 3.45 या वेळेत विशेष ब्लॉक घेण्यात आला. चार तासांच्या ब्लॉकने अनेक लोकल गाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत केले. नियोजित ब्लॉकबाबत प्रवाशांना आगाऊ सूचना दिलेली नाही. केवळ विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर ब्लॉकचा तपशील शेअर केला होता. प्रसारमाध्यमांमधून ब्लॉकची माहिती न पोहचल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. शेवटची कर्जत लोकल तसेच इतर गाडय़ा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादर स्थानकातून मार्गस्थ करण्यात आल्या. रेल्वे प्रशासनाकडून गाडय़ांच्या वेळापत्रकातील बदलाबाबत योग्य प्रकारे अनाऊन्समेंट करण्यात आली नाही. त्यामुळे गाडीची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना आयत्या वेळी धावाधाव करावी लागली. अनेक प्रवाशांनी पश्चिम रेल्वेवरून अंधेरीपर्यंत प्रवास करीत पुढे बसने घाटकोपर गाठले. रात्रीच्या वेळेस घेतल्या जाणाऱया ब्लॉकची काही दिवस आधी पुरेशी माहिती देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
पश्चिम रेल्वेवर आज मोठा ब्लॉक
एल्फिन्स्टन पुलाचा मोठा गर्डर हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री 1.30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. याव्यतिरिक्त वसई रोड-विरारदरम्यान रात्री 12.15 ते पहाटे 4.15 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या ब्लॉक काळात अनेक लोकल फेऱया रद्द केल्या जाणार आहेत, तर काही गाडय़ा वांद्रे आणि दादर येथून चालवण्यात येतील. तसेच चर्चगेट-प्रभादेवीदरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून अनेक एक्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

























































