
वृद्ध आईसोबत ईद साजरी करण्यासाठी दोन महिने केरळला जाण्याची परवानगी मागणाऱया हनी बाबू यांना दिलासा देण्यास विशेष एनआयए कोर्टाने नकार दिला. आरोपीने सादर केलेली कारणे ठोस आणि विश्वासार्ह नाहीत. प्रवासासाठी दिलेली कारणे पटणारी नाहीत तसेच अर्जामागील हेतू संशयास्पद वाटत असल्याचेही स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.
भीमा कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या हनी बाबू यांना डिसेंबर 2025 साली जामीन दिला असून, केरळला जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी त्यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. एनआयए कोर्टाचे विशेष न्यायाधीश चकोर बाविस्कर यांच्यासमोर हनी बाबू यांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तपास यंत्रणेने या मागणीला विरोध करत प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून, आरोपीला न्यायालयाच्या कार्यक्षेत्राबाहेर जाण्याची परवानगी दिल्यास तपास आणि सुनावणीवर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका न्यायालयात मांडली. हनी बाबू यांनी महिनाभरापूर्वीच अशाच प्रकारचा अर्ज केला होता आणि तोही न्यायालयाने फेटाळला होता.

























































