
पश्चिम रेल्वेच्या स्थानकांतील तिकीट खिडक्यांसमोरील रांगा अद्याप कमी झालेल्या नाहीत. तिकीट काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. या रांगामध्ये प्रवाशांचा बराच वेळ वाया जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपनगरी रेल्वे स्थानकांतील ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन्सची (एटीव्हीएम) संख्या वाढवण्याच्या कार्यवाहीला पश्चिम रेल्वे प्रशासनाने गती दिली आहे. चर्चगेट ते डहाणूपर्यंतच्या विविध स्थानकांवर आणखी 350 एटीव्हीएम बसवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील उपनगरी प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत रेल्वेच्या सुविधा अपुऱया पडत आहेत. त्यात तिकीट प्रणालीबाबत अनेक तक्रारी आहेत. यूटीएस अॅप बंद करून ‘रेलवन’ अॅप अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र ते अॅप विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. तसेच जुनी एटीव्हीएम अधूनमधून वारंवार बंद पडत आहेत. अशा कारणांमुळे तिकीट खिडक्यांसमोरील लांबच लांब रांगांचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. या पार्श्वभूमीवर चर्चगेट ते डहाणूपर्यंतच्या उपनगरी स्थानकांत अतिरिक्त 350 एटीव्हीएम बसवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. सद्यस्थितीत पश्चिम रेल्वेच्या 37 उपनगरी स्थानकांवर 430 एटीव्हीएम कार्यान्वित आहेत. प्रवासी संख्येच्या तुलनेत एटीव्हीएम वाढवण्याची मागणी जोर धरत आहेत. त्यानुसार 350 नवीन एटीव्हीएम बसवली जाणार आहेत. ज्या एटीव्हीएममध्ये वारंवार तांत्रिक बिघाड येत आहे, ती दुरुस्तीच्या निमित्ताने बाहेर काढली जातील. त्यांच्या जागीही नजीकच्या काळात नवीन एटीव्हीएम बसवणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने नवनवीन पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत रेल्वे स्थानक परिसर आणि पादचारी पुलांवर नवीन एटीव्हीएम बसवण्यात येणार आहेत. तांत्रिक समस्या दूर करण्याच्या हेतूने थर्मल प्रिंटर्स लावले जाणार आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर 48 टक्के डिजिटल तिकीटधारक आहेत. हे प्रमाण दोन महिन्यांत 50 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट पश्चिम रेल्वेने ठेवले आहे.


























































