
बांगलादेशी घुसखोरांना राज्य सरकारकडून अजूनही अन्न पुरवठा सुरूच आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) 1237 घुसखोरांची यादी अन्न व नागरी पुरवठा विभागाला पाठवून त्यांना रेशनकार्डे कशी मिळाली याची तपासणी करायला सांगितले होते. नऊ महिने उलटले तरी ती तपासणी झाली नसताना एटीएसने आणखी 400 घुसखोरांची यादी पाठवली आहे. आता 1637 घुसखोरांच्या रेशनकार्डांची तपासणी अन्न व नागरी पुरवठा विभागाला करावी लागणार आहे.
यादीत समाविष्ट असलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे रेशनकार्डवर आहेत का, याची पडताळणी करावी. रेशनकार्डे त्यांना कशी मिळाली आणि कुणी दिली याची चौकशी करावी, असे एटीएसने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवले होते. सचिवांकडून तसे निर्देश जिल्हा पुरवठादारांना देण्यात आले, मात्र एकाही पुरवठादाराकडून अद्याप कोणतीच माहिती आलेली नाही. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सह-सचिव अशोक अत्राम यांना विचारले असता, त्यांनी ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने विलंब होत असल्याचे सांगितले.


























































