
मेघा मजूमदार हे नाव तसं मराठी वाचकांसाठी परिचित नसलेलं. मात्र आपल्या वाचनाचा परीघ वाढवताना इंग्रजी भाषेचं बोट धरलं की भारतीय लेखकांचे विस्तारलेले जग आपल्याला गवसत राहते. तर या विस्तारलेल्या जगातील मेघा मजूमदार या लेखिकेला नुकतेच जागतिक पातळीवर प्रतिष्ठित अशा अमेरिकन लायब्ररी असोसिएशनच्या अॅण्ड्रय़ू कार्नेगी मेडल्स फॉर एक्सेलन्स या 2026 वर्षासाठीच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. मेघा मुजूमदार यांच्या ‘अ गार्डियन अँड अ थीफ’ या कादंबरीला हा पुरस्कार लाभला. त्यांची ‘अ गार्डियन अँड अ थीफ’ ही कादंबरी बिघडत चाललेल्या हवामान संकटांनी वेढलेल्या कोलकाता शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. बदलत्या काळातील प्रश्नांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसते. मेघा यांचे पहिले पुस्तक, ‘अ बर्निंग’, ही न्यूयॉर्क टाइम्सची बेस्टसेलर कादंबरी असून, तिला नॅशनल बुक अवॉर्ड, नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कलचा जॉन लिओनार्ड पुरस्कार आणि अमेरिकन लायब्ररी असोसिएशनच्या अॅण्ड्रय़ू कार्नेगी मेडलसाठी नामांकन मिळाले होते. भारतात या पुस्तकाला साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त झाला होता. भारतातील कोलकाता येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या मेघा आता न्यूयॉर्कमध्ये राहतात. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये भारतीय वंशाच्या लेखकांची उमटलेली ही मोहोर इथल्या वाचकवर्गालाही तितकीच सुखावणारी आहे.






























































