गोरेगावात रंगणार भव्य पुरस्कार वितरण सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा 2025चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा गोरेगाव पश्चिमेतील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडणार आहे. शनिवारी 28 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित केलेल्या या सोहळ्यात साहित्य, इतिहास आणि विचारप्रबोधनाचा संगम साधण्यात येणार आहे.

प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक, माजी उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला यंदा दुसऱया वर्षीही मोठा प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रासह गुजरात आणि कर्नाटक येथील 150 हून अधिक लेखकांनी सहभाग नोंदवत स्पर्धेची व्याप्ती अधिक व्यापक केली होती. स्पर्धेतील विजेत्यांमध्ये डॉ. क्षमा शेलार यांनी प्रथम क्रमांक, प्रभाकर मठपती यांनी द्वितीय, तर विनय खंडागळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. दरम्यान, पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार संजीव साबडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून इतिहास अभ्यासक, लेखक व प्रख्यात वत्ते प्रा. नितीन बानगुडे-पाटील हे ‘शिवचरित्र’ या विषयावर विशेष व्याख्यान सादर करणार आहेत.

स्पर्धेसाठी नामवंत विनोदी लेखक सॅबी परेरा आणि पत्रकार-लेखक-कवी विनोद पितळे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले, तर विजय नाडकर्णी यांनी प्राथमिक छाननी केली. स्पर्धेचे समन्वयन ‘मार्मिक’ साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेचे प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे यांनी केले.