
पुणे इसीस मॉडय़ूलप्रकरणी भिवंडीतून अटक करण्यात आलेला आरोपी शमील नाचन याला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज नकार दिला. तुरुंगातील सुरक्षेप्रकरणी कनिष्ठ न्यायालयात दाद मागा, असे आदेश देत मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने आरोपी नाचनची मागणी फेटाळून लावली.
जगभरात दहशत पसरवणाऱया इसीस मॉडय़ूलसाठी काम करणाऱया काही हस्तकांना राज्यातील विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. इसीस मॉडय़ूल प्रकरणात पकडलेल्या आरोपींचा देशात दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता तसेच जातीय सलोखा बिघडवण्याचे काम या दहशतवाद्यांकडून केले जाणार होते. त्यासाठी निधी गोळा करणे व तो निधी हस्तकांना पुरवणे, स्पह्टके तयार करणे, दहशतवाद्यांना आश्रय देणे असे आरोप एनआयएने केले आहेत. भिवंडीच्या पडघा येथून अटक करण्यात आलेल्या शमील साकीब नाचन याच्या विरोधात यूएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तुरुंगात आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा करत अन्य तुरुंगात हलवण्याची मागणी त्याने केली होती. या याचिकेवर आज बुधवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी शकील याची नागपूर तुरुंगातून तळोजा तुरुंगात बदली करण्यात आली असून आरोपी आता भायखळा येथील तुरुंगात असल्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली. त्यानंतरही तुरुंगात आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा शमीलकडून करण्यात आला.
हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत याचिकाकर्त्यांना सांगितले की, तुमच्या या दाव्यात काहीच तथ्य नाही. तुरुंगात सीसीटीव्हीसह सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यामुळे धोक्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी दाद मागायची असेल तर कनिष्ठ न्यायालयात मागा, असे नमूद करत याचिकाकर्त्याची मागणी फेटाळली व सदर याचिका निकाली काढली.

























































