
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून ती 23 एप्रिलला होणार आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाके) नेते, खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. न्यायालये ही अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची गुलाम झाली आहेत, असे म्हणत त्यांनी लोकशाहीतील सर्वोच्च संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनावणीच्या तारखा 50 वेळा पुढे ढकलल्या जात आहेत. हा घटनात्मक पेच सोडवण्याऐवजी न्यायालय दबावाखाली काम करत असल्याची बोचरी टीका राऊत यांनी यावेळी केली.
न्यायव्यवस्थेच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राऊत म्हणाले की, सतत तारखा देणाऱ्या न्यायायलयावर कोण विश्वास ठेवणार? विद्यमान न्यायमूर्ती किंवा त्याआधीच्या सरन्यायाधीशांनी दबावाखाली घेतलेल्या निर्णयांचे आता पुनरावलोकन होण्याची खरी गरज आहे. गौतम अदानी यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या अनेक खटल्यांमध्ये त्यांचा कधीही पराभव झाला नाही, याकडे लक्ष वेधत राऊत यांनी न्यायव्यवस्था राजकीय दबावाखाली असल्याचा दावा केला.
गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या खटल्यात केवळ तारखांवर तारखा पडत आहेत. सुनावणी पूर्ण झाली असतानाही अंतिम निकालासाठी वेळ काढला जात आहे, यावरून सर्वोच्च न्यायालय घटनात्मक पेच गांभीर्याने घेत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांनी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, हे एकदा हिमतीने देशाला सांगावे, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेना, पक्ष आणि चिन्ह यावरील खटल्याबाबत आमच्यावर दबाव आहे, हे त्यांनी हिंमतीने सांगायला हवं, असे राऊत म्हणाले.
यावेळी राऊत यांनी निवडणूक आयोगावरही बोचरी टीका केली. निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी आंध्र प्रदेशातील ईव्हीएम गैरव्यवहाराबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी निवडणूक आयोगाला ‘चोर’ म्हटले आहे. आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने मतदान झाले, त्याच प्रकारे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही निकाल फिरवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. आंध्रमध्ये रात्री 11 नंतर ईव्हीमच्या माध्यमातून 14 लाख मतं कशी वाढवण्यात आली हे परकला यांनी सांगितले. आंध्रमध्ये एक सिनेअभिनेता 21 च्या 21 जागा जिंकतो, 100% रिझल्ट. महाराष्ट्रातही हेच झालं. भाजपने जेवढ्या जागा लढवल्या त्याच्या 99 टक्के जागा जिंकल्या. कोण आहेत हे लोक? काय केलं यांनी? असं कोणत महान कार्य केलं यांनी, असा परखड सवाल राऊत यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालय, निव़डणूक आयोग, राष्ट्रपती, राज्यपाल या संविधानी संस्थेवरच जनतेचा संशय आहे, असे त्यांनी सांगितले.
इथे सगळे दामशास्त्री आणि कामशास्त्री
देशात आता कोणाकडूनही न्यायाची अपेक्षा उरली नसल्याची भावना व्यक्त करताना, इथे कोणीही ‘रामशास्त्री’ नसून सर्वजण ‘दामशास्त्री’ आणि ‘कामशास्त्री’ झाले आहेत, अशी जहरी टीका राऊत यांनी केली. स्वत: पक्षप्रमुखद उद्धव ठाकरे देखील न्यायालयाच्या या दिरंगाईमुळे निराश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



























































