
>> श्रीनिवास बेलसरे
सेवेची शिकवण देणाऱ्या प्रभू येशूने गुड फ्रायडेच्या आदल्या दिवशी सर्व शिष्यांचे पाय धुऊन रुमालाने पुसून दिले. त्यासाठी एक शिष्य तयार होईना. तो म्हणाला, ‘‘गुरुजी, आम्ही तुमची सेवा करावी हे योग्य, पण तुम्हीच आमची सेवा करणे योग्य नाही.’’ प्रभूचे उत्तर होते, ‘‘हाच तुम्हाला धडा आहे, उद्या मी गेल्यावर तुम्हीही इतरांची सेवा करावी म्हणून मी तुम्हाला आज उदाहरण घालून देत आहे. तुम्ही जर एकमेकांवर प्रेम कराल तरच जग ओळखेल की, तुम्ही माझे शिष्य आहात.’’ येशूच्या खऱ्या शिष्यत्वाची व्याख्या अशी जगावेगळी होती.
इतिहासात अनेक धर्मगुरू होऊन गेले. त्यांच्या शिकवणुकीने त्या त्या काळी समाजाच्या सामाजिक, आध्यात्मिक, भावनिक, अनेकदा तर राजकीय गरजा पूर्ण केल्या. मात्र बहुतेकांना शिष्याची संपूर्ण शरणागती अभिप्रेत असायची. कुणी म्हणायचे, ‘सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण ये’, तर कुठे कुणा एकाला शरण जाणे हीच शिष्यत्वाची पहिली अट असायची. येतानाच ‘ये याचका’ असे त्याचे स्वागत होत असे. कुणी संपूर्ण जग पादाक्रांत करण्याची शिकवण आपल्या शिष्यांना देत.
प्रभू येशूची शिकवण मात्र जगावेगळी होती. त्याची चार अतिसंक्षिप्त चरित्रे त्याच्या शिष्यांनी लिहून ठेवली आहेत. त्यातील मार्क नावाच्या शिष्याने लिहिलेल्या चरित्रातील दहाव्या अध्यायात दोन शिष्य प्रभूला विनंती करतात, ‘‘गुरुजी, स्वर्गारोहणानंतर आम्हाला तुमच्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसण्याचा अधिकार द्या.’’ त्यावर येशूने सर्वांना बोलवून सांगितले, ‘‘बघा, इतर लोकांत जसे अनुयायांवर, प्रजेवर प्रमुख राज्य करतात, हुकूम चालवतात तसे तुम्ही होऊ नका. तुमच्यातील ज्याला मोठे व्हायचे असेल त्याने स्वतःहून लहानपण स्वीकारावे. पहिला व्हायचे असेल त्याने शेवटचा होऊन सर्वांची सेवा करावी. मी स्वतःसुद्धा सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आलो आहे.’’
ही केवळ तोंडी शिकवण नव्हती. बायबलमधील नोंदीनुसार त्याने आयुष्यभर लोकांतील अंधश्रद्धा, वाईट रूढी, हिंसाचार, स्वार्थीपणा, देवाशी डील करून पापमुक्ती मिळवण्याची वृत्ती, भौतिक वैभवाची लालसा नष्ट करण्यासाठी प्रबोधन केले. अनेकांचे दुर्धर रोग बरे केले, अनेकांना दृष्टिदान दिले. त्यात तत्कालीन धर्ममार्तंडाचे हितसंबंध दुखावल्यानेच त्याला सुळी देण्याची योजना आखण्यात आली.
सेवेची शिकवण देणाऱया प्रभू येशूने गुड फ्रायडेच्या आदल्या दिवशी सर्व शिष्यांचे पाय धुऊन रुमालाने पुसून दिले. त्यासाठी एक शिष्य तयार होईना. तो म्हणाला, ‘‘गुरुजी, आम्ही तुमची सेवा करावी हे योग्य, पण तुम्हीच आमची सेवा करणे योग्य नाही.’’ प्रभूचे उत्तर होते, ‘‘हाच तुम्हाला धडा आहे, उद्या मी गेल्यावर तुम्हीही इतरांची सेवा करावी म्हणून मी तुम्हाला आज उदाहरण घालून देत आहे. तुम्ही जर एकमेकांवर प्रेम कराल तरच जग ओळखेल की, तुम्ही माझे शिष्य आहात.’’ येशूच्या खऱया शिष्यत्वाची व्याख्या अशी जगावेगळी होती.
प्रभू येशूच्या एका शिकवणुकीबद्दल अनेकदा आपल्याला संभ्रम पडतो. एका गालात मारल्यावर दुसरा गाल पुढे केल्याने काय होणार? जो आपला द्वेष करतो त्या शत्रूवर कसे प्रेम करणार? तीही शिकवण त्याने स्वतः जगून दाखवली. त्याला सुळावर चढवून ठार करणाऱया रोमन सैनिकांचा त्याने साधा रागही केला नाही. उलट क्रुसावर वेदनामय अवस्थेत तडफडत असतानाही या महान धर्मात्म्याने आपल्याला ठार मरणाऱयांसाठी देवाकडे प्रार्थना केली. त्याचे ते अजरामर शब्द जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वांना माहीत आहेत. “देवा, यांना क्षमा कर, आपण काय करतो ते त्यांना कळत नाही.’’ आपल्या मारेकऱ्यांसाठी प्रार्थना करणारा असा दुसरा धर्मगुरू जगाच्या इतिहासात झाला नाही.
त्याचाच परिणाम म्हणून जिथे भयंकर अज्ञान होते, हाताकरिता हात तोडणे, डोळ्याकरिता डोळा पह्डणे अशा शिक्षा होत्या. धर्मगुरू समाजाला अज्ञानात ठेवून लुटत होते. तिथूनच देव दयाळू आहे, त्याचे खरे पुत्र होण्यासाठी तुम्ही शत्रूवर प्रेम करा, इतरांची निरपेक्ष सेवा करा अशी शिकवण देणारा ख्रिश्चन धर्म निर्माण झाला. त्याच शिकवणुकीवर आधारित ‘रेड क्रॉस’सारख्या संस्था स्थापन झाल्या. तुरुंगांना शाळा मानून गुन्हेगारांना सुधारायची संधी देण्याचा विचार आला. ख्रिस्ती श्रद्धेप्रमाणे येशूने कोणताही प्रतिकार न करता स्वतःहून जे वेदनामय मरण स्वीकारले ते इतरांच्या पापासाठी केलेले प्रायश्चित्त होते. आज आपण त्याचे एखादे अतिसंक्षिप्त चरित्र वाचून त्याचे शांतिदायी, प्रीतिमय, दैवी विचार समजावून घेतले तरी खूप मोठी आध्यात्मिक उन्नती होऊ शकते.






























































