
पर्यटकांचा गैरफायदा घेत काही शेर्पा, ट्रेकिंग एजन्सींसोबत मिळून हे लोक पर्यटकांच्या जेवणात बेकिंग सोडा मिसळत होते. यामुळे पर्यटकांना तीव्र पोटदुखी, उलटी आणि इतर समस्या होत होत्या.
नेपाळमध्ये माऊंट एव्हरेस्टवर करण्यात आलेल्या बचाव संबंधित एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. काही शेर्पा आणि ट्रेकिंगशी संबंधित लोक एकत्र येऊन पर्यटकांना जेवणात सोडा किंवा एक विशिष्ट औषध मिसळून पर्यटकांना आजारी पाडत होते. माऊंट एव्हरेस्टवर पोहोचल्यानंतर त्याच पर्यटकांना महागडय़ा हेलिकॉप्टर रेस्क्यूद्वारे कोटय़वधी रुपयांचा विमा घोटाळा करत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नेपाळ पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत एकूण 32 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ट्रेकिंग कंपनीचे मालक, हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि रुग्णालयांशी संबंधित लोकांचा समावेश आहे. या सर्वांवर संघटित गुन्हेगारी आणि फसवणुकीचे आरोप लावण्यात आले आहेत.
नेपाळच्या उंच डोंगराळ प्रदेशात हेलिकॉप्टरने बचाव करणे अनेकदा लोकांचे प्राण वाचवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असतो. तिथे ऑक्सिजन कमी असतो आणि हवामान अचानक बिघडू शकते, त्यामुळे आजारी किंवा अडकलेल्या ट्रेकरला लवकर काठमांडूला पोहोचवणे आवश्यक असते. जेव्हा पर्यटक आजारी पडत, तेव्हा त्यांना महागडय़ा हेलिकॉप्टरने बचाव करण्यासाठी दबाव आणला जायचा. त्यानंतर बनावट वैद्यकीय अहवाल आणि फ्लाइट कागदपत्रे तयार करून आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांकडून पैसे वसूल केले जात होते, असे आरोप आहेत. या संपूर्ण घोटाळ्यात शेर्पा, हेलिकॉप्टर पंपन्या, ट्रेकिंग एजन्सी आणि रुग्णालये मिळून पैसे वाटून घेत होते. या घोटाळ्याद्वारे जवळपास 188 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. एका पंपनीवर आरोप आहे की, तिने 1248 बचावकार्यांपैकी 171 बनावट दाखवून 10 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त पैसे घेतले आहेत. दुसऱया एका पंपनीने 471 पैकी 75 बनावट बचावकार्य दाखवून 8 दशलक्ष डॉलर कमावले. तिसऱया पंपनीने 71 बनावट दाखले दाखवून 1 दशलक्ष डॉलर घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तपास करून 3 मोठय़ा बचाव कंपन्यांतील 6 अधिकाऱयांना अटक करण्यात आली आहे.



























































