
ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबादने अक्षरशः चौकार-षटकारांचा वर्षाव करत यजमान कोलकाता नाईट रायडर्सला त्यांच्या घरातच 65 धावांनी नामोहरम केले. हेन्रीक क्लासन, अभिषेक शर्मा आणि ट्रव्हिस हेड यांच्या तुफानी फलंदाजीमुळे हैदराबादने 226 धावांचा डोंगर उभारला आणि नंतर गोलंदाजांनी केकेआरचा 161 धावांत खुर्दा पाडत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. केकेआरचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. 2012 नंतर प्रथमच त्यांच्यावर सलामीलाच सलग पराभवाची नामुष्की सहन करावी लागली.
टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या हैदराबादने 20 षटकांत 8 बाद 226 धावा केल्या. हेन्रीक क्लासनने (52) अर्धशतक झळकावत आक्रमणाची धुरा सांभाळली, तर अभिषेक शर्मा (48) आणि ट्रव्हिस हेड (46) यांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडत केकेआरच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. प्रत्येक फटक्यात आक्रमकता आणि आत्मविश्वास झळकत होता. हेड आणि शर्माला अर्धशतक झळकावता आले नसले तरी दोघांनी सहा षटकांत 84 धावांची घणाघाती सलामी दिली.
कोलकात्याची फलंदाजी कोसळली; रघुवंशीचा प्रयत्न व्यर्थ
227 धावांच्या अवघड लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात जोरदार झाली. फिन अॅलनने अवघ्या 7 चेंडूंत 28 धावा करत हैदराबादवर हल्ला केला, पण त्याचा झंझावात तात्पुरताच ठरला. तो बाद होताच कोलकात्याचा कणाच मोडला. मुंबईकर अंगक्रिष रघुवंशीने सलग दुसऱया सामन्यात अर्धशतक (52) झळकावले. त्याला रिंकू सिंगने (35) साथ दिली, पण संघाला विजय मिळवून देता आला नाही. केकेआरचा डाव 16 षटकांत 161 धावांवर संपला.
जयदेव उनाडकटने 3 विकेट घेत निर्णायक घाव घातला, तर ईशान मलिंगा आणि नीतिश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी 2 विकेट घेत केकेआरचा डाव उद्ध्वस्त केला. हर्ष दुबेनेही 1 विकेट घेत आपली भूमिका बजावली. 39 धावा आणि गोलंदाजी 2 विकेट टिपणारा नीतिश विजयाचा शिल्पकार ठरला.




























































