
देशातील वाढत्या बेरोजगारीमुळे केवळ शिक्षित तरुणांना नैराश्य येत नाही तर त्यांच्या पालकांनाही नैराश्याचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. मुलांना उच्च शिक्षण देऊनही नोकरी मिळत नसल्याने पालकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती लॉज्निटय़ुडिनल एजिंग सर्व्हे ऑफ इंडियाच्या आकडेवारीतून समोर आली आहे. हे सर्वेक्षण आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केले असून यात 45 वर्षांहून अधिक वयाच्या 73 हजारांहून अधिक लोकांकडून यासंबंधीची माहिती गोळा करण्यात आली होती.
स्वीडनमधील उमेआ विद्यापीठाच्या संशोधकांनी या आकडेवारीचा सखोल अभ्यास केला आहे. सोशल सायन्स अँड मेडिसन या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, उच्च शिक्षित मुलांच्या बेरोजगारीमुळे पालकांना नैराश्य येण्याचा धोका 3.14 टक्के ते 12.48 टक्क्यांपर्यंत वाढतो. ज्या कुटुंबात पालक त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी पूर्णपणे मुलांवर अवलंबून असतात तिथे हा धोका आणखी वाढतो, असे दिसते. मुलगा किंवा मुलगी वृद्धापकाळात आई-वडिलांचा आधार होईल, असा समज खोलवर रुजला आहे. त्यामुळे मुलगा शिकल्यानंतरही नोकरी मिळत नसेल तर पालकांना नैराश्य येण्याचा धोका अधिक वाढतो



























































