वॅन डर डुसेन तडकाफडकी निवृत्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेचा भरवशाचा फलंदाज असलेल्या वॅन रॅसी डर डुसेनने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि एक दमदार, सातत्यपूर्ण कारकीर्द पडद्याआड गेली. 35 वर्षीय डुसेनने सोशल मीडियावरून आपला निर्णय जाहीर करत ‘प्रोटियाजची जर्सी घालणे हा आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान’ असल्याची भावनिक कबुली दिली.बुधवारीच दक्षिण आफ्रिकन क्रिकेटने आपल्या पेंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर केली होती आणि या यादीतून डुसेनला वगळण्यात आले होते. याच कारणास्तव त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवल्याचे खासगीत बोलले जात आहे.

वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करूनही वॅन डर डुसेनने आपल्या जिद्दीने मोठं नाव कमावलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 71 सामन्यांत 2657 धावा, सरासरी 50 च्या पुढे ही त्याची आकडेवारी त्याच्या सातत्याची साक्ष देते. एबी डिव्हिलियर्सनंतर या प्रकारात दक्षिण आफ्रिकेच्या विश्वासार्ह फलंदाजांमध्ये त्याची गणना झाली. 6 शतके, 17 अर्धशतके ठोकत त्याने आफ्रिकन संघाला नेहमीच आधार दिला आहे.

त्याग मोठा होता, पण प्रत्येक क्षण मोलाचा होता, असे सांगत त्याने क्रिकेट दक्षिण आफ्रिका, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे आभार मानले. पत्नी लाराचा विशेष उल्लेख करत  ती प्रत्येक चढ-उतारात खंबीरपणे सोबत उभी राहिली, असेही तो म्हणाला. वाँडरर्स मैदानावरील क्षण त्याच्यासाठी कायम स्मरणात राहतील. निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेटपासून तो दूर जाणार नाही. देशांतर्गत क्रिकेट खेळत तरुणांना मार्गदर्शन करण्याचा निर्धार त्याने व्यक्त केला-म्हणजेच त्याचा ‘खेळ’ अजून संपलेला नाही.