
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षनेतृत्वावरून टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेल कुठेही दिसले नाहीत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता पटेल दिल्लीत कधी येतात, केव्हा जातात तुम्हालाच माहिती, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्टपणे सांगत पटेल यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली.
दोन दिवसांच्या दिल्ली दौऱयावर असलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांची भेट घेतली. या राज्यसभेतील अनेक सहकार्यांसोबत संवाद साधला. एरवी दिल्ली वारीत पटेल-तटकरे सोबत असतात, मात्र यावेळी दोघेही सोबत का नाहीत? असे कारमध्ये बसताना सुनेत्रा पवार यांना पत्रकारांनी विचारले. त्यावर त्यांनी ते कधी येतात आणि कधी जातात, तुम्हालाच माहिती, मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही,’ असे म्हणत पटेल यांचा विषय एका वाक्यात संपवला. यामुळे पक्षनेतृत्व आणि पटेल-तटकरे यांच्यात पक्षात सारे काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.
सुनेत्रा पवार आणि पटेलांमध्ये कशावरून वाद?
पटेल यांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र देऊन पक्षातील सगळे अधिकार आपल्याकडे घेतले, याची कुणकुण लागताच सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी आयोगाला पत्र पाठवून 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान केलेला पत्रव्यवहार अधिकृत धरला जाऊ नये, असे म्हटले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यावर निवडणूक आयोगाकडे सोपविलेल्या पक्ष पदाधिकाऱयांच्या यादीत पटेल आणि तटकरे यांच्या पदाचा उल्लेखही टाळण्यात आल्याने सुनेत्रा पवार आणि पटेल-तटकरेंमध्ये वाद निर्माण झाला.
पार्थ पवारांकडून सारवासारव
पार्थ पवार यांनी ‘एक्स’वर पटेल आणि तटकरे यांच्याबाबत एक पोस्ट केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात पसरवल्या जाणाऱया बातम्या निराधार आणि काल्पनिक आहेत. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची अनेक दशकांची निष्ठा आणि नेतृत्व आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे. अशा ज्येष्ठ नेत्यांना काल्पनिक वादांमध्ये ओढणे अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे, अशी पोस्ट करत पार्थ पवार पक्षांतर्गत सुरू असलेल्या वादावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

























































