
मुलुंडमधील एलबीएस मार्गावर ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो 4’ मार्गिकेच्या कामादरम्यान मेट्रोच्या खांबांवरील सिमेंटचा कठडा कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना दिलासा दिला आहे. वेल्डिंग करणाऱया कर्मचाऱयाची कृती या तत्काळ घटनेचे कारण असून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी होणाऱया तांत्रिक चुकांमध्ये अर्जदारांचा सहभाग नव्हता असे निरीक्षण नोंदवत सत्र न्यायालयाने तिघा आरोपींची सुटका केले.
मुलुंड एलबीएस मार्ग येथे मेट्रोच्या कामासाठी वापरण्यात आलेला एक प्री-कास्ट पॅरापेट अचानक कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात संबंधित जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नियमित जामीन मिळावा यासाठी आरोपींनी अॅड. सुवर्णा आव्हाड-वास्त आणि अॅड. प्रल्हाद परांजपे यांच्या वतीने अर्ज दाखल केला त्या अर्जावर अतिरिक्त न्यायाधीश एम. बी. ओझा यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. अर्जदारांच्या वतीने अॅड. सुवर्णा आव्हाड-वास्त यांनी न्यायालयात बाजू मांडताना स्पष्ट केले की, ही घटना कोणत्याही प्रकारच्या स्ट्रक्चरल दोषामुळे किंवा जाणीवपूर्वक केलेल्या कृतीमुळे घडलेली नाही. उलट, कामाच्या ठिकाणी देण्यात आलेल्या स्पष्ट सूचनांचे उल्लंघन केल्याने हा प्रकार घडला आहे. अर्जदार हे केवळ पर्यवेक्षकीय आणि प्रशासकीय भूमिकेत होते, त्यांचा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी होणाऱया तांत्रिक अंमलबजावणीत थेट सहभाग नव्हता.



























































