IPL 2026 – माझ्या यशावर लोक जळतात, माझ्याविरुद्ध अजेंडा राबवतात; शांत स्वभावाच्या अजिंक्य रहाणेचा संयम सुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची सुरुवात खराब झाली आहे. सलामीच्या दोन्ही लढतीत कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुरुवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध कोलकाताला 65 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यावर टीकेचा वर्षाव होऊ लागला. या टीकेला रहाणेनेही चोख उत्तर दिले आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये रहाणेचा पारा चांगलाच चढल्याचे दिसले. नेहमी शांत राहणारा रहाणे टीकाकारांवर चांगलाच बरसला.

सलग दोन पराभवानंतर अजिंक्य रहाणे याला त्याचा स्ट्राईक रेट, सलामीवीर म्हणून भूमिका आणि फलंदाजीच्या शैलीबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने आकडेवारी मांडत टीकाकारांचे तोंड बंद केले. टीकाकार सामने न पाहताच मते बनवत आहेत, असेही तो म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, 2023 पासून माझा स्ट्राईक रेट सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. जे लोक माझ्याबद्दल बोलत आहेत, ते कदाचित सामने पाहत नाहीत किंवा त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी अजेंडा आहे. त्यांना मला खेळताना पाहणे आवडत नसावे. मला जे यश मिळाले आहे, कदाचित लोक त्याचा हेवा करतात किंवा माझ्यावर जळतात. मी याची पर्वा करत नाही. एका डावामुळे काहीही बदलत नाही. माझा हेतू योग्य होता, पण कधीकधी लय सापडत नाही. लोक माझ्याबद्दल बोलत आहेत ही चांगली गोष्ट आहे, मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक, असेही रहाणे म्हणाला.

दरम्यान, अजिंक्य रहाणे याचा दावा पूर्णपणे चुकीचाही नाही. 2023 पासून पॉवरप्लेमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 167.78 राहिला आहे. किमान 300 चेंडू खेळलेल्या फलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर ट्रॅव्हिस हेड (178.98), दुसऱ्या स्थानावर अभिषेक शर्मा (176.56) आणि तिसऱ्या स्थानावर फिल सॉल्ट (173.8) आहे. मात्र, मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजीसमोर रहाणेची कमजोरी दिसून येते. कारण मधल्या षटकांमध्ये त्याला स्ट्राईक रेट घसरून 114.02 वर येतो. यामुळेच त्याच्या फलंदाजीवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. ‘न्यूज 18‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही अजिंक्य रहाणे अपयशी ठरला. तो 10 चेंडूत फक्त 8 धावा करून बाद झाला. जयदेव उनादकटने त्याला पाचव्या षटकात पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या लढतीत 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ 161 धावांमध्ये गारद झाला. एकवेळ कोलकाताचा संघ 3 बाद 120 अशा सुस्थितीत होता. मात्र त्यानंतर अवघ्या 41 धावांमध्ये कोलकाताने 7 विकेट्स गमावल्या.