
आम आदमी पार्टीने राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा यांची अचानक पक्षाच्या उपनेतेपदावरुन उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नियुक्ती केली आहे. राज्यसभा सचिवालयाला यासंदर्भात पक्षाने पत्र लिहून माहिती दिली. यानंतर ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. गप्प करण्यात आलंय, पण पराभूत नाही, असे म्हणत त्यांनी ‘आम आदमी’ला खास संदेश दिला आहे.
मला संसदेत बोलण्याची संधी मिळते तेव्हा मी सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडतो. जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा आहे का? माझ्याकडून काही चूक झाली का? मी जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य माणसांच्या समस्यांबद्दलच बोलतो. मग कोणीतरी मला बोलण्यापासून आणि जनहिताचे मुद्दे मांडण्यापासून का रोखत आहे? असा सवाल राघव चढ्ढा यांनी उपस्थित केला आहे.
मी संसदेत नेहमी सामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करतो. विमानतळावर मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांचा मुद्दा झोमॅटो-ब्लिंकिटच्या चालकांचा मुद्दा, खाद्यपदार्थांतील भेसळीचा मुद्दा, टोलनाक्यांपासून ते बँकांच्या लुटीचा मुद्दाही उपस्थित केला. एवढेच नाही तर मध्यमवर्गीयांवर लादण्यात आलेला कर, कंटेंट क्रिएटर्सवरील स्ट्राईक आणि टेलिकॉम कंपन्या रिचार्जद्वारे कशी लूट सुरू आहे हे मुद्दे मी संसदेत उपस्थित केले. हे मुद्दे उपस्थित केल्याने सर्वसामान्यांचा फायदा झाला, पण ‘आम आदमी पार्टी’ला नक्की काय तोटा झाला? मला बोलण्यापासून का रोखण्याचा प्रयत्न होतोय? असा सवालही राघव चढ्ढा यांनी उपस्थित केला. यावेळी आपल्या समर्थकांना सोबत राहण्याचे आवाहन केले.
Silenced, not defeated
My message to the ‘aam aadmi’
—
खामोश करवाया गया हूँ, हारा नहीं हूँ‘आम आदमी’ को मेरे संदेश pic.twitter.com/poUwxsu0S3
— Raghav Chadha (@raghav_chadha) April 3, 2026
तत्पूर्वी त्यांनी ‘इव्हिल आय’ इमोजीसह एक व्हिडीओ शेअर केला होता. राघव चढ्ढा यांनी वरिष्ठ सभागृहातील आपल्या भाषणांच्या काही खास भागांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी ‘इव्हिल आय’ अर्थात नजर सुरक्षा कवचचा इमोजी पोस्ट केला. या विषयावर त्यांनी सोशल मीडियावर इतर कोणतेही भाष्य केले नाही किंवा सार्वजनिकरित्या कोणतेही शब्द उच्चारले नाहीत.
— Raghav Chadha (@raghav_chadha) April 2, 2026
दरम्यान, माध्यमात आलेल्या वृत्तानुसार कथित शिस्तभंग आणि पक्षाच्या ध्येयधोरणांचे काटेकोरपणे पालन न केल्यामुळे चढ्ढा यांना बाजूला करण्यात आले आहे. कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची सुटका झाल्यानंतरही राघव चढ्ढा यांनी मौन बाळगले होते. केजरीवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेलाही ते अनुपस्थित होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना अटक झाली तेव्हाही चड्ढा यांनी कोणतेही विधान केले नव्हते. त्यावेळी त्यांनी ब्रिटनमध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचे कारण दिले होते.

























































