
म्यानमारमधील राजकीय पेचप्रसंग अधिक गडद झाला असून, देशाचे लष्करप्रमुख जनरल मिन आंग हलाईंग यांनी आता अधिकृतपणे ‘कार्यवाहू राष्ट्रपती’ म्हणून पदभार स्वीकारला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर गेलेले मागील कार्यवाहू राष्ट्रपती म्यिंट स्वे यांच्याकडून ही जबाबदारी हलाईंग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
म्यानमारच्या लष्करी परिषदेने जाहीर केले की, देशाचे प्रशासकीय कामकाज सुरळीत चालवण्यासाठी लष्करप्रमुखांकडे हे सर्वोच्च पद सोपवण्यात आले आहे. 1 फेब्रुवारी 2021 रोजी म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर जनरल मिन आंग हलाईंग हेच सत्तेचे मुख्य केंद्र राहिले आहेत. आता राष्ट्रपती पदाची सूत्रे हाती घेतल्याने त्यांची सत्तेवरील पकड अधिक मजबूत झाली आहे. ते म्यानमारच्या सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ आहेत.
म्यानमारमध्ये सध्या तीव्र अंतर्गत संघर्ष सुरू आहे. अनेक प्रांतांमध्ये बंडखोर गट आणि लष्कर यांच्यात युद्ध सुरू असल्याने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अशा परिस्थितीत जनरल मिन आंग हलाईंग यांनी राष्ट्रपती पद स्वीकारल्याने, म्यानमारमध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना लवकर होण्याची चिन्हे कमी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


























































