
अतिप्राचीन व नवसाला पावणारे दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री रेणुकादेवीच्या वासंतिक नवरात्रोत्सव यात्रेची सांगता शुक्रवारी ३ मार्च रोजी सायंकाळी भव्य वहन मिरवणुकीने करण्यात आली. तब्बल २४ तास चाललेल्या या मिरवणुकीत विदर्भासह राज्यभरातून लाखो भाविकांनी सहभाग नोंदवत भक्तीभावाचा महासागर अनुभवायला मिळाला. यंदाच्या यात्रेमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले.
गुरुवारी २ मार्च रोजी भल्या पहाटे शेलुद येथून मानाचे पातळ मातेला चढविण्यात आले. वगदी प्रदक्षिणेद्वारे नवस पूर्ण करण्यासाठी हजारो भाविक शहरात दाखल झाले होते. सायंकाळी ७ वाजता आरती नंतर श्री रेणुकामातेच्या मंदिरापासून वाघावर स्वार असलेल्या मातेच्या पूर्णाकृती मूर्तीची भव्य वहन मिरवणूक काढण्यात आली. लोकमान्य टिळक नगर, बागवानपुरा, नगर परिषद परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, संत रोहीदास नगर, राऊतवाडी, बुलढाणा बायपास, खामगाव नाका, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, सिमेंट रोड, चिंच परिसर व जुना गाव अशा विविध मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. शुक्रवारी दुपारी मिरवणूक पुन्हा श्रींच्या मंदिरात दाखल होत यात्रेची सांगता करण्यात आली. रात्रभर भाविकांची प्रचंड गर्दी असून हजारो भक्तांनी पायी चालत मिरवणुकीत सहभाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभागाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार विजय सवडे, ठाणेदार भुषण गावंड, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यात्रेवर लक्ष ठेवून होते. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील विविध संस्था, संघटना व व्यक्तींनी ठिकठिकाणी महाप्रसाद, पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. भारूड, पारंपरिक संगीतमय कार्यक्रम, आकर्षक देखावे आणि धार्मिक सादरीकरणांनी मिरवणुकीला वेगळेच रंग चढवले. पंचायत समिती मैदान, राऊतवाडी बस स्टॉप आणि शिवाजीनगर परिसरात आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
भाविकांची विक्रमी गर्दी
उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाही यात्रेला भाविकांची विक्रमी गर्दी झाली. गुरुवारी दुपारपासूनच शहरात भाविकांचा ओघ वाढत गेला. यंदाची गर्दी ही मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे जाणकारांनी सांगितले. नगर परिषदेच्या वतीने पाणपोई उभारण्यात आल्या तर विविध संस्था, पतसंस्था व सामाजिक संघटनांनी महाप्रसादाचे आयोजन केले.
अमृतसरच्या दलेर खालसा ग्रुपचे थरारक सादरीकरण –
वहन मिरवणुकीदरम्यान अमृतसरहून आलेल्या दलेर खालसा ग्रुपने तलवारींचे थरारक स्टंट सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधले. वेगवान तलवारबाजी, अंगावर काटा आणणार्या कसरती आणि अचूक समन्वयामुळे प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोष उसळत होता. सुमारे १० ते १२ जणांच्या या पथकाच्या धाडसी सादरीकरणामुळे यात्रेचे आकर्षण अधिकच वाढले. आई रेणुका मातेच्या यात्रेनिमित्त चिखली नगरीत भक्ती, जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्सवाची भव्य आणि दिमाखदार सांगता झाली.
























































