इराण-अमेरिका युद्धामुळे पाकिस्तानात तेलाचा भडका; ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट’ ३० दिवसांसाठी फ्री; शेहबाज शरीफ सरकारचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील शेहबाज शरीफ सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजधानी इस्लामाबादमध्ये पुढील ३० दिवसांसाठी सर्व सार्वजनिक वाहतूक (पब्लिक ट्रान्सपोर्ट) मोफत करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असे वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पाकिस्तानात इंधन दरवाढ करण्यात आली. यामुळे आता तेथे एक लिटर पेट्रोलचा दर ४५८ रुपये (पाकिस्तानी) तर, डिझेलचा दर ५२० रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तसेच केरोसीन (घासलेट) देखील ४५७ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

देशातील तेल संकट अधिक गडद होऊ नये आणि लोकांनी आपल्या वैयक्तिक गाड्यांचा वापर कमी करावा, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे बोलले जात आहे. दरम्यान, इराण युद्धाचा परिणाम केवळ पाकिस्तानवरच नव्हे तर संपूर्ण आशियाई बाजारपेठेवर होताना दिसत असून, इंधन टंचाईच्या भीतीमुळे पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलले आहे.